पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी

Image

अलिबाग, २७जुलै /प्रतिनिधी :- महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील.

या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्री.कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाडचे तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी यावेळी उपस्थित होते.

नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

रत्नागिरी:- अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत  दिल्या.

चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल श्री. कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी चिपळूण शहरातील व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशिष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदत कार्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी  संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांना दिली. त्याचप्रमाणे सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.