राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 8 हजारांवर,१५६ रूग्णांचा मृत्यू

मुंबई ,११ जुलै /प्रतिनिधी :-  राज्याची कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णसंख्येत चढ उतार हा कायम आहे. पण चिंताजनक बाब म्हणजे आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा हा कोरोना बाधितांपेक्षा कमी आहे.

महाराष्ट्रात दैनंदिन आढळणाऱ्या नव्या कोरोना रुगणांची संख्या ही अजूनही 8 हजारांच्या वर नोंदवली जात असून पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याचा हा परिणाम असल्याचं स्पष्ट होत आहे.

करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. मागील २४ तासात राज्यात ८ हजार ५३५ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार १३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १५६ करोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात करोनाचा धोका अद्यापही कायमच असल्याचे दिसून येत असून, सर्वांनीच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६१,५७, ७९९ झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत ५९,१२,४७९ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०२ टक्के आहे. याचबरोबर, राज्यात करोनामुळे १,२५,८७८ रूग्ण दगावले असून, राज्याचा मृत्यू दर २.०४ टक्के आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,१६,१६५ आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत राज्यात ४,४०,१०,५५० नमुन्यांची तपासणी केली गेली असून, यापैकी ६१,५७,७९९ नमूने (१३.९९ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ५,९६,२७९ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार ६७२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट उलटण्याचा आणि तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोनानं धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये 1193, साताऱ्यात 755 तर सांगलीत 927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे.