कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून शहरी व ग्रामीण भागात कोविड- १९ संसर्गाबाबत सतर्कता सतर्कता वाढवावी–पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड/ अंबाजोगाई, दि. १ ::-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून शहरी व ग्रामीण भागात कोविड १९ संसर्गाबाबत सतर्कता वाढविण्यासाठी जनतेमध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतर व विविध नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत विविध विषयांची आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ.माले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर, श्री सचिन मुळीक, श्री राजकिशोर मोदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार आणि विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागावर ताण वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले जावे असे सांगितले. ते म्हणाले , कोरानाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांमध्ये त्यांची योग्य देखभाल केली जावी व उपचारात आवश्यकतेनुसार बदल करण्याची प्रक्रियेतील वेळ कमी होऊन तातडीने व्हावी. अंबाजोगाई येथील नवीन रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देताना येथे सतत डॉक्टर्स उपलब्ध राहतील आणि रुग्णांना चांगली वैद्यकीय उपचार होतील याची काळजी घेतली जावी असे, पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले.

रोजगार हमी बाबत आढावा घेताना जिल्ह्यात या योजनेतून अनेक कामे घेणे शक्य असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले फळबाग योजनेसाठी रोहयो मधून असलेले प्रकरणे तातडीने पूर्ण केली जावीत याच बरोबर पांदण रस्त्यांची कामे आणिे पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात शेतकरी लाभार्थ्यांना जनावरांसाठी गोठे दिले जावे यासाठी रोहयो मधील योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी महावितरण तर्फे जिल्ह्यातील रोहित्र ( ट्रांसफार्मर )तक्रारी कमी वेळेत सोडवण्याच्या सूचना केल्या यासाठी ट्रांसफार्मर ला ऑईलची असणारी अडचण दूर करण्याच्या सूचना महावितरणच्या मुंबई येथील संचालकांना दूरध्वनीद्वारे दिल्या.

यावेळी आमदार प्रकाश सोळुंके यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप , महावितरण ट्रांसफार्मरचा अडचणी , रोहयोतील लाभ यासह विविध विषयांच्या अनुषंगाने तर आमदार संजय दौंड यांनी आपले पीककर्ज बाबत विचार व्यक्त केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तलाठ्यांमार्फत तक्रार अर्ज स्वीकारून त्यातील बँक निहाय याद्या बँकांना देऊन अर्ज प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी कार्यवाही केल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी covid-19 च्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.यावेळी उपस्थित डॉ. माले तसेच डॉ. थोरात, डॉ पवार यांसह महावितरण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , सरकारी व खाजगी बँक , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी , महसूल , पोलीस, आरोग्य आदी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *