महामारीपासून आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्याच्या गरजेवर दिला भर-पंतप्रधान

महामारीच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला सावरण्यात , जोडण्यात , दिलासा देण्यात आणि आनंदी ठेवण्यात मदत केली: पंतप्रधान
प्रतिभा, बाजारपेठ, भांडवल , परिसंस्था आणि खुलेपणाची संस्कृती या पाच स्तंभांवर आधारित भारतात गुंतवणूक करण्यासाठी मी जगाला आमंत्रित करतो- पंतप्रधान

नवी दिल्ली,१६जून /प्रतिनिधी :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात  बीजभाषण केले. 2016 पासून दरवर्षी पॅरिसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आणि युरोपमधील सर्वात मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी  एक असलेल्या विवा टेक 2021 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून बीजभाषण देण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात  आले होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची  उदयोन्मुख क्षेत्र आहेत. हे सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल. फ्रेंच खुल्या टेनिस  स्पर्धेसाठी इन्फोसिसने पुरवलेले तांत्रिक सहाय्य  आणि जगातील सर्व कंपन्या आणि नागरिकांना सेवा देणार्‍या दोन्ही देशांच्या आयटी प्रतिभेची उदाहरणे म्हणून फ्रान्सच्या अ‍ॅटॉस, कॅपजेमिनी आणि भारताच्या टीसीएस आणि विप्रो या  कंपन्यांच्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की जेथे पारंपरिक रीती  अपयशी ठरतात तिथे नवसंशोधन मदत करते.  पंतप्रधान म्हणाले, महामारीच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला सावरण्यात , जोडण्यात , दिलासा देण्यात आणि आनंदी ठेवण्यात  मदत केली. भारताची सार्वत्रिक आणि वैशिष्ट्यपूर्ण  बायो-मेट्रिक डिजिटल ओळख प्रणाली – आधारने   गरीबांना वेळेवर आर्थिक सहाय्य पुरवण्यात मदत केली. “आम्ही 80 कोटी लोकांना मोफत अन्न पुरवठा करू शकलो  आणि बर्‍याच घरांना स्वयंपाकासाठी अनुदानित इंधन  देऊ शकलो . विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारतात आम्ही स्वयं आणि दिक्षा हे दोन सार्वजनिक डिजिटल शिक्षण कार्यक्रम त्वरित  राबवू शकलो. ”असे  पंतप्रधानांनी सांगितले.

महामारीच्या आव्हानाचा सामना  करण्यात  स्टार्ट अप क्षेत्राने पार पाडलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.  पीपीई किट्स, मास्क, चाचण्याचे किट इत्यादींच्या टंचाईवर  मात करण्यात खासगी क्षेत्राने  महत्त्वाची भूमिका बजावली.  डॉक्टरांनी टेलि-मेडिसिनचा  मोठ्या प्रमाणात अवलंब केला जेणेकरून काही कोविड आणि बिगर -कोविड समस्या व्हर्च्युअली दूर करता येतील.  दोन लसी भारतात तयार केल्या जात आहेत आणि आणखी काही विकास किंवा चाचणीच्या  टप्प्यात आहेत. स्वदेशी आयटी प्लॅटफॉर्म, आरोग्य-सेतु मुळे संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात मदत झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मने लाखो लोकांना लस सुनिश्चित करण्यात मदत केली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट-अप व्यवस्थेचे  केंद्र आहे. अलिकडच्या वर्षांत अनेक कल्पना  समोर आल्या आहेत. नवकल्पना आणि गुंतवणूकदारांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी देण्याची भारताची तयारी असते. गुणवत्ता , बाजारपेठ , भांडवल , पोषक व्यवस्था  आणि, मोकळेपणाची संस्कृती या पाच आधारस्तंभांच्या आधारे पंतप्रधानांनी  जगाला भारतात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले. भारतात गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यासाठी भारतीय गुणवत्ता, मोबाइल फोन  आणि  सातशे पंचाहत्तर दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आणि आणि जगात सर्वाधिक स्वस्त डेटा वापर तसेच सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर. यासारख्या सामर्थ्यावरही  पंतप्रधानांनी जोर दिला.

देशभरातील अत्याधुनिक सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, पाचशे तेवीस हजार किलोमीटर फायबर ऑप्टिक नेटवर्कने  जोडलेल्या  एक लाख छप्पन हजार ग्रामपंचायती, सार्वजनिक वायफाय नेटवर्क यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केल्याची पंतप्रधानांनी यादी सांगितली. नवोन्मेषाच्या संस्कृतीचे  संवर्धन  करण्याच्या प्रयत्नांची विस्तुत माहिती त्यांनी दिली.  अटल नवोन्मेष अभियाना अंतर्गत सात हजार पाचशे शाळांमध्ये अत्याधुनिक नवनिर्मिती प्रयोगशाळा  आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रातील विस्कळीतपणाबद्दल बोलताना,पंतप्रधानांनी असा आग्रह धरला की व्यत्यय म्हणजे निराशा असा अर्थ होत नाही.त्याऐवजी सुधारणा आणि सज्जतेच्या  दुहेरी पायावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.“गेल्या वर्षी याच काळात जगात अद्याप  लस संशोधन सुरु होते. आज आपल्याकडे बऱ्याच लसी आहेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या पायाभूत सुविधांची आणि अर्थव्यवस्थांची सुधारणाही आपण सुरूच ठेवली पाहिजे.आम्ही भारतात खाण, अंतराळ , बँकिंग, अणु उर्जा वगैरे सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात सुधारणा राबवल्या. अगदी महामारीच्या मध्यावरही भारत परिवर्तनाभिमुख आणि क्रियाशील राष्ट्र आहे ” असे श्री. मोदी म्हणाले.

पुढच्या महामारी विरूद्ध आपल्या ग्रहाचे संरक्षण करण्याच्या तसेच पर्यावरणीय र्‍हास थांबविणारी शाश्वत जीवनशैली यावर लक्ष केंद्रित असल्याचे सुनिश्चित करणे, संशोधन आणि नवोन्मेषला  पुढे नेण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. या आव्हानावर मात करण्यासाठी सामूहिक भावनेने आणि मानव केंद्रित  दृष्टिकोनातून पुढाकार घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी स्टार्ट अप समुदायाला  केले. “स्टार्ट-अप च्या अवकाशात  तरुणांचे वर्चस्व आहे.हे लोक भूतकाळाच्या ओझ्यापासून  मुक्त आहेत.जागतिक सत्ता परिवर्तनात त्यांना  स्थान उत्तम आहे. आपल्या स्टार्ट अप्सने आरोग्यसेवा,पर्यावरणस्नेही  तंत्रज्ञानासह कचरा पुनर्प्रक्रिया, शेती, शिकण्याची नवी साधने “.यांसारख्या क्षेत्रात  संशोधन  केले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

फ्रान्स आणि युरोप हे भारताच्या महत्त्वाच्या  भागीदारांमध्ये आहेत यावर पंतप्रधानांनी भर  दिला. मे महिन्यात पोर्तो येथे झालेल्या युरोपियन युनियनच्या  नेत्यांसमवेत झालेल्या शिखर परिषदेत अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या संवादाचा  संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की , स्टार्ट-अप्सपासून क्वांटम कंप्यूटिंगपर्यंत डिजिटल भागीदारी ही प्रमुख प्राधान्य  म्हणून उदयाला आली. “इतिहासाने हे सिद्ध केले आहे की , नवीन तंत्रज्ञानाचे नेतृत्व आर्थिक सामर्थ्य , रोजगार आणि समृद्धी आणते.मात्र आपल्या भागीदारीने देखील मानवतेच्या सेवेचे मोठे उद्दिष्ट पार पाडणे आवश्यक आहे.ही महामारी  केवळ आपल्या क्रियाशीलतेची  परीक्षाच नाही तर आपल्या कल्पनाशक्तीला सर्वांसाठी अधिक समावेशक करणारी , काळजी घेणारी आणि शाश्वत भविष्य घडविण्याची संधी आहे, असे पंतप्रधान आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले.