स्वदेशी 5G टेस्ट-बेड निर्मिती हे दूरसंचार क्षेत्रातील महत्वपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल-पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ,१७ मे /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यानिमित्त एका टपाल तिकीटाचे देखील त्यांनी अनावरण  केले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, देवुसिंह चौहान आणि एल मुरुगन आणि दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना  संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, आज देशाला समर्पित केलेला स्वदेशी बनावटीचा  5G टेस्ट  बेड, दूरसंचार क्षेत्रातील महत्वपूर्ण  आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण  होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आयआयटीसह या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. “5G च्या रूपात देशाचे स्वतःचे 5G मानक बनवले आहे, ही देशासाठी खूप अभिमानाची बाब आहे. देशातील खेड्यापाड्यात 5G तंत्रज्ञान पोहचवण्यात ते मोठी भूमिका बजावेल,” असे ते म्हणाले.

कनेक्टिव्हिटी 21 व्या शतकातील भारतातील प्रगतीचा वेग निश्चित करेल असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीचे आधुनिकीकरण करावे लागणार आहे. 5G तंत्रज्ञान देशाच्या प्रशासनामध्ये, राहणीमानात आणि व्यवसाय सुलभतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे, असे ते म्हणाले.  यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात विकासाला चालना मिळेल. यामुळे सुविधाही वाढतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. 5G च्या जलद अंमलबजावणीसाठी सरकार आणि उद्योग दोघांच्या प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले.

आत्मनिर्भरता आणि निकोप स्पर्धा समाज आणि अर्थव्यवस्थेवर कसा गुणात्मक प्रभाव निर्माण करते याचे उत्तम उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी दूरसंचार क्षेत्राचा उल्लेख केला. 2G युगातील निराशा, हताशा , भ्रष्टाचार आणि धोरण लकवा यातून बाहेर पडून देश वेगाने 3G वरून 4G आणि आता 5G आणि 6G च्या दिशेने वाटचाल करत आहे असे ते म्हणाले.

गेल्या 8 वर्षांत दूरसंचार क्षेत्रात पोहोच, सुधारणा, नियमन, प्रतिसाद आणि क्रांती या ‘पंचामृता’ ने नवीन ऊर्जेचा संचार केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्रेय त्यांनी ट्रायला दिले. पंतप्रधान म्हणाले की, देश आता ‘संपूर्ण सरकारी दृष्टिकोन’ घेऊन पुढे जात आहे. आज आपण देशातील दूरध्वनी जोडण्या आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात सर्वात वेगाने विस्तारत आहोत, दूरसंचारसह अनेक क्षेत्रांनी त्यात योगदान दिल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, गरीबातील गरीब कुटुंबांना मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी देशातच मोबाईल फोनच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. याचा परिणाम असा झाला की मोबाईल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढून 2 वरून 200 पेक्षा अधिक झाली.

आज भारत देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने जोडत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की 2014 पूर्वी, भारतातील 100 ग्रामपंचायतींनाही ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी पुरवण्यात आली नव्हती. आज आम्ही  सुमारे 1.75 लाख ग्रामपंचायतीपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवली आहे. यामुळे शेकडो शासकीय सेवा गावागावात पोहोचत आहेत.

वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ट्रायसारख्या नियामकांसाठी देखील ‘संपूर्ण सरकारी दृष्टीकोन’ महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “आज नियमन केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. तंत्रज्ञान विविध क्षेत्रांना एकमेकांशी जोडत आहे. म्हणूनच आज प्रत्येकाला सहकार्यात्मक नियमन करण्याची गरज भासत  आहे. यासाठी सर्व नियामकांनी एकत्र येणे, सामायिक व्यासपीठ विकसित करणे आणि उत्तम समन्वयासाठी उपाय शोधणे आवश्यक आहे”, असे  पंतप्रधान म्हणाले.