मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई ,९ जून /प्रतिनिधी:- मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळी सहानंतर पाऊस थांबला आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आजपासून 12 जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, पालघर, जोगेश्वरी, अंधेरी, कांदवली, बोरवली, नालासोपारा, वसई याठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत  काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस  मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले

कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

मुंबईत पंपिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेल्या पाण्याचा लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी  वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षास आज दुपारी भेट देऊन मुंबई महानगरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासह निरनिराळ्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.

यावेळी  महानगरपालिकेच्या सभागृह नेता  विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन)  प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.