मनी लॉंड्रिंग प्रकरणात सचिन वाझेंना जामीन

मुंबई ,१८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- ईडी मनी लॉन्ड्रीग प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला. सचिन वाझे यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. सचिन वाझे यांनी सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामीन अर्ज दाखल केला होता. सचिन वाझे यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला होता.

सचिन वाझेंना जामीन दिल्यास तो पुराव्याशी छेडछाड करु शकतो असे सांगत ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद १५ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला होता. वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित आहे. मात्र जामिन मिळून सुद्धा इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने वाझे यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहेत.

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलिस निरिक्षक सुनील मानेला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.