कोविड व्यवस्थापनामध्ये पंतप्रधानांनी दिला नवा मंत्र : ‘जहा बीमार वहा उपचार’

नवी दिल्ली,२१ मे /प्रतिनिधी:-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे  संवाद साधला.

या संवादादरम्यान डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी, निरंतर आणि  सक्रीय नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. यामुळे आरोग्य पायाभूतसुविधा  उंचावण्यासाठी आणि आवश्यक औषधे आणि व्हेंटीलेटर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यासारख्या महत्वाच्या उपकरणांचा पुरेसा पुरवठा राखण्यासाठी मदत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोविडचा प्रसार रोखण्यासाठीचे गेल्या एक महिन्यातले प्रयत्न,लसीकरणाची स्थिती आणि  भविष्यातली आव्हाने पेलण्यासाठी जिल्हा सज्ज राखण्याकरिता उचलण्यात आलेली पावले आणि नियोजन याबाबत पंतप्रधानांना यावेळी माहिती देण्यात आली. म्युकर मायकोसीसच्या धोक्याबाबत आपण दक्ष आहोत,या आजाराच्या व्यवस्थापनासाठी आधीच पावले उचलली असून सुविधा निर्माण केल्याचे डॉक्टरांनी  सांगितले.

कोविड विरोधात लढा देणाऱ्या मनुष्यबळाच्या सततच्या प्रशिक्षणाचे महत्व  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विशेषकरून ग्रामीण भागात सेवा करणाऱ्या निम वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी प्रशिक्षण सत्रे आणि वेबिनारचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना केली. जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण कमी आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. 

वाराणसी मधल्या डॉक्टर,परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, रुग्ण वाहिकेचे चालक आणि आघाडीवरच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. वाराणसी मध्ये अल्पावधीत ज्या वेगाने ऑक्सिजन आणि आयसीयु खाटा वाढवण्यात आल्याची  तसेच कमी काळात पंडित राजन मिश्रा कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात आल्याची त्यांनी प्रशंसा केली.  वाराणसी मधली एकात्मिक कोविड कमांड प्रणाली उत्तम रीतीने काम करत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच वाराणसीचे उदाहरण जगासाठी स्फूर्तीदायी ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

महामारी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी वैद्यकीय पथकांची प्रशंसा केली. आत्मसंतुष्ट न राहण्याचे आवाहन करतानाच विशेषकरून वाराणसीचा ग्रामीण भाग आणि  पूर्वांचलवर लक्ष केंद्रित करत प्रदीर्घ लढ्यासाठी त्यांनी आवाहन केले. देशात तयार करण्यात आलेल्या योजना  आणि गेल्या काही वर्षात चालवण्यात आलेल्या अभियानामुळे, कोरोना विरोधातल्या लढ्यात मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे, आयुष्मान भारत योजने अंतर्गत मोफत उपचाराच्या सुविधा, उज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर, जन धन बँक खाती किंवा फिट इंडिया मोहीम, योग विषयक जागृती आणि आयुष यामुळे कोरोना विरोधात लढा देण्यासाठी लोकांचे बळ वाढल्याचे ते म्हणाले.  

कोविड व्यवस्थापनामध्ये ‘जहा बीमार वहा उपचार’ हा  नवा मंत्र त्यांनी दिला. रुग्णाच्या दारात उपचार उपलब्ध करून दिल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल असे ते म्हणाले. ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ आणि ‘घरपोच औषधे’ या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. हे उपक्रम शक्य तितके ग्रामीण भागात अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केले. काशी कवच ही टेली मेडिसिन सुविधा पुरवण्यासाठी डॉक्टर,प्रयोगशाळा  आणि ई विपणन कंपन्या यांना एकत्र आणणारा उपक्रम अतिशय कल्पक उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 विरोधातल्या सध्याच्या लढ्यात खेडोपाडी  आशासेविका  आणि एएनएम अर्थात आरोग्य सेविका  भगिनी बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला आणि  त्यांचा अनुभव आणि क्षमता यांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केले. आधीच लसीकरण झाल्याने आघाडीचे कर्मचारी या दुसऱ्या लाटेत जनतेची सेवा अधिक सुरक्षितपणे करू शकले. लसीकरणाची आपली पाळी येईल त्यावेळी प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. 

पूर्वांचल मध्ये मुलांमधल्या, मेंदूशी निगडीत असलेल्या एन्सेफलायटीस  या आजारावर, उत्तर प्रदेश सरकारच्या सक्रीय प्रयत्नामुळे  मोठ्या प्रमाणात नियंत्रण प्राप्त केल्याचे उदाहरण देत अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरानी त्याच संवेदनशीलतेने आणि दक्षतेने काम करण्याचे आवाहन  पंतप्रधानांनी केले. महामारीविरोधातल्या लढ्यात काळ्या बुरशीने निर्माण केलेल्या नव्या आव्हाना बाबत त्यांनी सावध केले. याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक व्यवस्था आणि खबरदारी  याकडे लक्ष पुरवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड विरोधातल्या लढ्यात वाराणसीमधल्या लोक प्रतिनिधिनी  केलेल्या नेतृत्वाची प्रशंसा त्यांनी केली. लोक प्रतिनिधिनी जनतेच्या संपर्कात राहावे आणि टीका करण्या ऐवजी संवेदनशीलता दाखवावी असा सल्ला त्यांनी दिला.एखाद्या नागरिकाची काही तक्रार असेल तर  त्याबद्दल काळजी घेण्याचे लोक प्रतिनिधीचे काम आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचे वचन पाळत असल्याबद्दल त्यांनी वाराणसीच्या जनतेची प्रशंसा केली.