मासिक पाळीच्या काळात महिलांना लसीपासून धोका ?

मुंबई,२५ एप्रिल /प्रतिनिधी  : केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेनुसार आता देशातील १८ ते ४५ या वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे आता १ मे पासून देशातील सर्वच नागरिकांचे लसीकरण या मोहिमेअंतर्गत करण्यात येईल. मात्र लसीकरणात अफवा पसरविणारे अनेक मेसेज सोशलमिडीयावर व्हायरल करण्यात येत आहेत. यापैकी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आज मन की बात मधील संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. असाच एक मेसेज सोशलमिडीयावर काही दिवसांपासून व्हायरल करण्यात येत आहे. यात महिलांनी मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेऊ नये, असा दावा केला जात आहे. या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे समोर आल्याने अफवांपासून लांब राहा!, असे आवाहन मुंबई महापालिकेने दिले आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या सर्व सोशलमिडीया खात्यावरून याबाबत जनजागृती करणारे संदेश प्रसारित केले आहेत. यात पालिकेने माहिती देताना म्हंटले आहे की, या मेसेजमधील दावा खोटा आहे. अफवांपासून लांब राहा!, असे आवाहन मुंबई महापालिकेने दिले आहे. महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यातील माहिती खोटी असून, मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे. त्यामुळे व्हायरल होणारा हा फोटो खोटा असल्याचे समोर आलं आहे. मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे महिलांनी या दाव्यावर विश्वास ठेऊ नये.

व्हायरल संदेशात केलेला दावा काय ?

महिलांसाठी विशेष सूचना: येत्या १ मे पासून १८ वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाची मोहिम सुरु होणार आहे. परंतु महिलांसाठी हे महत्त्वाचे आहे की मासिक पाळीची तारीख आणि कधी घ्यावे हे समजूनच लसीकरणाचा निर्णय घ्यावा. मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर किंवा पाच दिवसानंतर लसीकरण करु नये. कारण त्यावेळेस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता फार कमी झालेली असते. लसीकरण हे सुरुवातीला आपाली रोगप्रतिकारक क्षमता कमी करते आणि नंतर ते खूप झपाट्याने वाढवते. जेव्हा आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी असते तेव्हा कोरोना लागण होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ही खबरदारी घ्यावी. कृपया ही माहिती आपल्या घरात, मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य सांगा…लसीकरणाला देऊ साथ… कोरोनावर करु मात…, असे यात म्हटले आहे. याबाबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.