विरोधकांच्या राजकारणाचे टोपेंकडून खंडन

मुंबई,२३ एप्रिल /प्रतिनिधी 

आज सकाळी विरार येथील खासगी रुग्णालयातील आग दुर्घटनेत १४ जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाकडून पाठपुरावा पहाटेपासूनच सुरू करण्यात आला होता. मात्र सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या विधानातील एका गौण उल्लेखाचा विपर्यास करून विरोधकांनी राजकरण सुरू केलं. या राजकारणाला खोडून काढत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे.

“राज्यातील जनता तसेच प्रसारमाध्यमे मला नव्याने ओळखत नाही. माझ्यावर असलेल्या दुःखद प्रसंगाच्या वेळेतही मी कर्तव्य व जबाबदारीलाच महत्त्व दिले आहे. सामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हीच माझी भूमिका नेहमी असते. विरार दुर्घटनेत माध्यमांना सकाळी पहिली प्रतिक्रिया देणारा मंत्री मीच होतो, ज्यात विरार रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, मन व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे, दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराच्या दुखात आम्ही मनापासून सहभागी आहोत, शासनाकडून या परिस्थितीत जे काही शक्य होईल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत, बाधित कुटुंबीयांना पाच लाख शासनाकडून, पाच लाख पालिकेकडून असे दहा लाख प्रतिव्यक्ती देण्यात येतील. फायर ऑडिट, कन्स्ट्रक्शन ऑडिट या सर्व नियमांचे पालन झाले का या गोष्टी अधिक कडक पद्धतीने तपासल्या जातील अन्यथा कारवाई केली जाईल याबाबत अत्यंत संयमाने व स्पष्टपणे मी उत्तर दिले.

तरीदेखील मी असंवेदनशील आहे असे कोणाला का वाटू शकते? त्यामुळे शब्दांचा विपर्यास करू नये. सकाळी सात वाजल्यापासून सर्व माध्यमांवर एकच गोष्ट सुरू होती. ज्यात या प्रकरणी कमिटी गठित करू, कारवाई करू अशा सर्व संवेदना आम्ही व्यक्त केल्या होत्या. जो प्रश्न विचारण्यात आला तो अत्यंत पॉइंटेड प्रश्न होता. सकाळी देशाच्या पंतप्रधानांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सला जाण्यासाठी केवळ दहा मिनिटे शिल्लक होती. या दरम्यानच राज्याचे कोणते मुद्दे या व्हीसीमध्ये मांडणार हा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला. त्या प्रश्नांचे उत्तर मी देत होतो ज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हॅक्सिन या तीन मुद्द्यांवर राज्याच्या वतीने बोलले जाईल असे उत्तर देत असतानाच विरार दुर्घटनेचा प्रश्न विचारण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल राज्य शासनाने घेतली आहेच असे उत्तर दिले. त्यामुळे मी बोललेल्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. असे होऊ नये. तसेच कोणता प्रश्न आहे, त्याचे उत्तर काय दिले. कोणती व्यक्ती व त्याचा इतिहास काय या सगळ्याची गोळाबेरीज करून योग्य अंदाज लावण्यात यावा. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष व आम्ही एकत्रपणे विधानसभेत काम करत आहोत. त्यामुळे व्यक्तिमत्त्व एक ठरलेलं असतं. ज्यात आज एखादा संवेदनशील असतो उद्या तो असंवेदनशील व्यक्ती होतो असा प्रकार नाही. आज आपण एकजुटीने या महामारीला संपवून जिंकूया. यासाठी केवळ एकजूटी हाच मंत्र आहे, असे पंतप्रधानही या व्हीसीमध्ये म्हणाले.” हा दाखला देऊन राजेश टोपे यांनी विरोधकांनी केलेल्या राजकारणाचे खंडन केले.