राज्यात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रामधील परिस्थिती  अद्यापही चिंताजनक– आरोग्य सचिव

नवी दिल्ली ,६ एप्रिल २०२१:महाराष्ट्रामध्ये 81 लाखांपेक्षा जास्त लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे आणि आठ लाखांपेक्षा जास्त लोकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांकडून लसीकरण मोहीम अतिशय प्रभावी पद्धतीने राबवली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. नवी दिल्ली येथे नॅशनल मीडिया सेंटरमध्ये वार्ताहरांशी बोलताना त्यांनी कोविड-19 प्रतिबंधासाठी उचललेल्या पावलांची, सज्जतेची आणि सद्यस्थितीची माहिती दिली. लसीकरण मोहीम राबवताना गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळ यांनी देखील चांगली कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा प्रणालीचे रक्षण करणे हा अशा प्रकारच्या लसीकरण मोहिमेचा उद्देश असतो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 55,469 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आता 31,13,354 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे 297 जणांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा आता 56,330 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात आज 34,256 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 25,83,331 रूग्ण बरे झाले आहेत. 
  
गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 10,030 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4,72,600 झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 11,832 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात कोविड रुग्णांमध्ये सर्वाधिक भर घालणाऱ्या दहा जिल्ह्यांपैकी सात जिल्हे एकट्या  महाराष्ट्रात असून उर्वरित प्रत्येकी एक कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्लीमधील असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे खालीलप्रमाणे आहेतः

पुणे,

मुंबई,

ठाणे,

नागपूर,

नाशिक,

बंगळूरु (शहरी),

औरंगाबाद,

अहमदनगर

दिल्ली,

दुर्ग

महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमधील परिस्थिती  अद्यापही चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात सरासरी 3000 दैनंदिन रुग्णांपासून आता सरासरी 44,000 दैनंदिन रुग्णांची नोंद होत  आहे आणि सरासरी दैनंदिन 32 मृत्यूंवरून सरासरी दैनंदिन 250 मृत्यूंची नोंद होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील एकूण रुग्णसंख्या आणि मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असणे अतिशय चिंताजनक आहे असे ते म्हणाले. एकूण रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्राचा वाटा 58 टक्के आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 34 टक्के आहे.

महाराष्ट्राचा कोरोना संसर्गाचा दर फेब्रुवारीच्या पूर्वार्धात 6 टक्क्यांपर्यंत खाली उतरला होता तो गेल्या आठवड्यात 24 टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. ही बाब चिंताजनक असून जिथे गरज असेल तिथे लोकांच्या अलगीकरणासंदर्भात कठोर उपाययोजना करण्याबाबत आपण पावले उचलली पाहिजेत असे राजेश भूषण यांनी सांगितले. महाराष्ट्रात आर टी पीसीआर चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मार्चच्या पहिल्या आठवड्यातील 71 टक्क्यांवरून आता हे प्रमाण गेल्या आठवड्यात 60 टक्कयांपर्यंत खाली आले आहे, असे ते म्हणाले.

भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागांमध्ये फिरत्या चाचणी प्रयोगशाळांचा वापर करण्याची सूचना आपण महाराष्ट्राला केली आहे, असे ते म्हणाले. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मदत करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संपूर्ण देश या महामारीशी संपूर्ण ताकदीनिशी संघर्ष करत आहे आणि आपल्याला कोविड प्रतिबंधक वर्तन, प्रतिबंध, चाचण्या, रुग्णालयांची सज्जता आणि सर्वत्र लसीकरणाची व्याप्ती वाढवणे, विशेषतः अतिशय गंभीर स्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये या उपाययोजना केल्या पाहिजेत, असे नीती आयोगाचे सदस्य(आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले. देशातील सातत्याने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तनाचा अंमल करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. कोविड-19 विरोधातील संघर्षामध्ये पुढील चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असून या महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी जन भागीदारीची एक सकारात्मक लाट अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.