परभणी जिल्ह्यात 25 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी

परभणी, दि.18 :- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 कलम 144 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये दि .19 ते 25 मार्च 2021 पर्यंत सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण परभणी जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

संचारबंदीतुन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी – कर्मचारी त्यांचे वाहनास, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने , सर्व औषधी दुकाने वैद्यकीय कर्मचारी , वैद्यकीय रूग्णालयातील कर्मचारी , वैद्यकीय आपातकाल व त्यासंबंधी सेवा , वैद्यकीय कारणासाठी बाहेर जाणारे व येणारे नागरिक , रुग्णवाहिका , वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना नेणारी वाहने, प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी आणि वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने, घरोघरी जावून दुध विक्री करणे, रात्री रेल्वे व बसमधून उतरणारे नागरिक, लसीकरण केलेले नागरीक, अत्यावश्यक सेवेबाबतची वाहने व त्यांचे चालक आदी व्यक्ती व समूहास सूट देण्यात आली आहे.

संचारबंदीच्या काळात कोणतीही व्यक्ती, वाहने रस्त्याने, बाजारात व गल्ली आणि घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.