अजित पवारांनी ‘त्या’ वक्तव्याबद्दल मागितली माफी

पुणे ,७ जानेवारी /प्रतिनिधी :- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख करण्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. त्यावरुन राज्यभरात निदर्शनेही झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली. पण आता अजित पवारांकडून पुन्हा वादग्रस्त उल्लेख झाला. मात्र यावेळी अजित पवारांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली.

पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्याविषयी बोलताना, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा झाला. यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली.मात्र, या उल्लेखानंतर लगेचच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब’ या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,” अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.