समीर वानखेडे यांची न्यायालयात धाव

नवी दिल्ली,७ जानेवारी /प्रतिनिधी :- अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्याने चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती.

माझ्यावर बेहिशेबी संपत्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मला अटक होऊ शकते. जप्तीची कारवाई होऊ शकते. माझ्या मालमत्तेची तपासणी होऊ शकते. तशी सूचना अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) केली आहे. या कारवाईपासून मला संरक्षण द्यावे, अशी मागणी वानखेडे यांनी याचिकेत केली होती.

न्या. अनुप जयराम बम्बानी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या कारवाईबाबत वानखेडे यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नव्हता. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर ही याचिका करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर वानखेडे यांनी ही याचिका मागे घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. तसेच तपास यंत्रणेने चौकशीसाठी काही पत्रव्यवहार केल्यास त्याआधारावर तुम्ही संबंधित न्यायालयात दाद मागू शकता, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारीमुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी प्रमुख समीर वानखेडे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवर ड्रग्जसहित समीर वानखेडे यांच्या टीमने पकडले होते. या प्रकरणामुळे समीर वानखेडेंवर अनेक आरोप झाले होते. नंतर आर्यनला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली. एनसीबीने कोर्टात आरोपपत्र दाखल करताना आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडल्याचा पुरावा नाही असे सांगितले. आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली.

माजी मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या धर्माचा मुद्दा उपस्थित केला होता. ते मुस्लिम नाहीत, असा दावा मलिक यांनी केला होता. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे मलिक म्हणाले होते. केंद्रीय अल्पसंख्याक विभागाने वानखेडे यांना क्लिन चिट दिली होती. मात्र आता एनसीबीनेच एसीबीला चौकशी आदेश दिले आहेत, असा दावा वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे वानखेडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत.