दोन दुचाकी आणि १२ रेसर सायकल चोरणाऱ्याला पाच महिन्यांचा कारावास
औरंगाबाद, ३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- दोन दुचाकी आणि १२ रेसर सायकल चोरणाऱ्या अर्जुन बेलाआप्पा वाणी (४०, रा.सातपूर, शिवाजीनगर, ता.जि.नाशिक) याला पाच महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी बुधवारी दि.३० ठोठावली. विशेष म्हणजे आरोपी हा अटकेपासून जेलमध्येच आहे.
या प्रकरणात मोहम्मद सादेक मोहम्मद खाजा यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, २१ जून रोजी फिर्यादीने आपली दुचाकी (क्रं. एमएच-२०-ईक्यू-५२०३) मोलाना आझाद कॉलेजच्या भिंतीलगत हॅन्डललॉक करुन उभी केली होती. संधी साधत चोरट्याने दुचाकी लंपास केली.या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरु असतांना २७ जून २०२२ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारस आरोपी अर्जुन वाणी हा आमखास मैदानाजवळ एका दुचाकीवर संशयीत रित्या उभा होता. ही माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलिसांनी अर्जुन वाणी याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने दोन दुचाकी आणि बारा सायकली चोरल्याची कबुली दिली.
या प्रकरणात तपास अधिकारी पोलिस नाईक राजपुत यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील अमेर काजी यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुच्या युक्तीवाद आणि साक्षीपुराव्यावरुन न्यायालयाने आरोपीला भादंवी कलम ३७९ अन्वये वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी सहायक फौजदार बी.वाय. किरड यांनी काम पाहिले.