लॉकडाऊन काळात अन्न, नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम

राज्यात एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल, मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे, तर ६२ लाख ८४ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई, दि. ६ जून :- कोविड- १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्य वाटपात विक्रम नोंदविला आहे. एप्रिल महिन्यात ६८ लाख १३ हजार क्विंटल, मे महिन्यात ७६ लाख ८३ हजार क्विंटल धान्याचे वाटप, तसेच १ एप्रिल ते ५ जूनपर्यंत ६२ लाख ८४ हजार ४१३ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत महिन्यात साधारणतः ३५ लाख क्विंटल धान्य वितरित केले जाते. मात्र, एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३१ लाख ५१ हजार क्विंटल मोफत तांदूळ वाटपामुळे दुप्पट म्हणजे ६८ लक्ष १३ हजार क्विंटल अन्नधान्य वाटप केले आहे. मे आणि जूनमध्ये केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त १ लाख ५० हजार क्विंटल धान्य वाटप केले जात असल्याने मे महिन्यात ७६ लक्ष ८३ हजार क्विंटल धान्य वितरित करण्यात आले आहे.

कोविड-१९ काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाने राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून योग्य नियोजनाद्वारे राज्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

एप्रिल महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ६.६९ कोटी नागरिकांना ३६ लाख ६१ हजार क्विंटल (९५%) धान्य वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना नियमित धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो मोफत तांदूळ देण्यात येत असून या योजनेंतर्गत एप्रिल महिन्यात ५ कोटी ९३ लाख (९० टक्के) लाभार्थ्यांना ३१ लाख ५१ हजार ३८० क्विंटल मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. तर Portability मुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या ३६ लाख ५८ हजार ६९९ लाभार्थ्यांनी एप्रिलमध्ये राज्यात ते जिथे आहेत तिथे धान्य घेतले आहे.

मे महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ६.५८ कोटी नागरिकांना ३६ लाख ९२ हजार ९० क्विंटल (९० टक्के) धान्य वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६ कोटी २ लाख लाभार्थ्यांना ३१ लाख ७३ हजार २२० क्विंटल (९१ टक्के) मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. Portability मुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या १९ लाख ४६ हजार ५३४ स्थलांतरित लाभार्थ्यांनी राज्यात ते जिथे आहेत तिथे धान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तुरडाळ किंवा चणाडाळ प्रत्येक महिन्याला प्रति कार्ड एक किलो देण्यात येत आहे. एप्रिल महिन्याची प्रती कार्ड प्रती महिना एक किलो याप्रमाणे मे महिन्यात तर मे व जून महिन्यात देय असलेली डाळ जून महिन्यामध्ये वाटप करण्यात येत असून या योजनेंतर्गत मे महिन्यामध्ये ९७ हजार ५ क्विंटल डाळ वितरित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केसरी कार्डधारक ३ कोटी ८ लाख लाभार्थ्यांपैकी १ कोटी ५८ लाख (५२ टक्के) नागरिकांनी मे मध्ये ८ लाख १८ हजार क्विंटल धान्य घेतले. यामध्ये प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्यात येत आहे.

कोविड-१९ कालावधीत शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ करण्यात आल्यामुळे राज्यात आता दररोज ८३८ शिवभोजन केंद्रांमधून दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण होत आहे. राज्यात एप्रिल महिन्यात ७७२ केंद्रांमधून २३ लाख ९९ हजार ७३७ शिवभोजन थाळ्या, मे महिन्यात ८३८ केंद्रांमधून ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्या तर जून महिन्यात दि. १ ते ५ जून पर्यंत ८३८ केंद्रांमधून ५ लाख ६३६ शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *