मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत

राज्य शासनाच्या वतीने दि. 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ , पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Marathi Bhasha Divas | BPM High School

मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी राज्य शासनाच्यावतीने काय पावले उचलली जात आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी.

कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रमांवर भर

प्रश्नः – मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा  करण्यात येत आहे. यात कोणकोणते उपक्रम घेण्यात आले ?

सुभाष देसाई :-   मराठी भाषा विभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात झाले. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांच्या नियोजनात मर्यादा होत्या. लोकांना सहभागी करून घेतांना सामाजिक अंतराचे भान राखणे आवश्यक होते. यावर्षी ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात आला. दरवर्षी मराठीत योगदान देणाऱ्या लोकांचे  कौतुक केले जाते. राज्यशासनात काम करणाऱ्यापैकी अनेक जण साहित्य निर्मितीत योगदान देतात. यावर्षी मराठी भाषेसाठी तळमळीने काम करणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांचा कौतुक समारंभ केला. तसेच बेस्ट उपक्रमाच्या ‘निलांबरी’ या बसमधून मराठी भाषेच्या क्षेत्रिय कार्यालयांचे प्रसिध्द साहित्य/ग्रंथ  फिरत्या प्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहोचविले. मराठी भाषा विभागाने अभिवाचन स्पर्धा, साहित्य यात्री प्रश्नमंजूषा स्पर्धा  यांचे आयोजन मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त केले होते.

मराठीतून करा स्वाक्षरी

सुभाष देसाई :-मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्वाक्षरीचे प्रकार दाखविण्यासाठी श्री. गोपाळ वाकोडे यांना दि. 28 जानेवारीला मंत्रालयातील  त्रिमुर्ती प्रांगणात आमंत्रित करण्यात आले आहे. या दिवशी मंत्रालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी स्वत: लिहून प्रसिध्द केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्षेत्रिय कार्यालयांनी सांस्कृतिक कार्य विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध विद्यापीठे, महाराष्ट्र टाईम्स इत्यादींच्या सहकार्याने वेबिनार, प्रत्यक्ष मुलाखती, व्याख्याने, काव्यसंमेलने  इत्यादींचे आयोजन केलेले आहे. सर्व कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

कोविडच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतांना जास्तीतजास्त ऑनलाईन पध्दतीने व्याख्याने, चर्चासत्रे, वेबिनार इत्यादीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक अंतर राखून तसेच कोविड बाबतच्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

सुभाष देसाईः-मराठी भाषेचे संवर्धन करत असतांना मराठी भाषेची तरुण पिढीतही लोकप्रियता वाढावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे इंटरनेटच्या माध्यमातून वेबिनार घेतले गेले. लहान मुलांसाठी चित्रकला, भाषा पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. ॲप तयार करण्यात आले, संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. स्पेलचेक सारखी सुविधा मराठीतील ऱ्हस्व – दीर्घ तपासता यावे यासाठीची सेवा गुगल तर्फे देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

प्रश्नः- शासकीय व्यवहारांबरोबरच खासगी आस्थापनांमधून मराठीचा वापर वाढावा यासाठी काय करता येईल?

सुभाष देसाई :-शासकीय कार्यालयांमधून प्रशासकीय कामकाजात मराठीचा 100 टक्के वापर व्हावा यासाठी राजभाषा अधिनियम, 1964 आहे. त्याचप्रमाणे राज्यातील खासगी आस्थापनांमधून मराठीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने ‘मराठी बोला, मराठीत व्यवहार करा’ ही चळवळ वाढीस लागेल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्यातुन हे राज्य घडले. राज्यात मराठीचा वापर होणे आवश्यक आहे. इंग्रजीची कास धरा मात्र मराठीचा दुस्वास करू नका.

प्रश्नः- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले. त्याबद्दल काय सांगाल?

सुभाष देसाई : राज्यात मराठी भाषा सक्तीची व्हावी यासाठी भाषेचा अधिकृत कायदा करावा असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निर्देश दिले. राज्यातील सर्व शाळांमधून मराठी सक्तीची करण्यात आली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 01.06.2020 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच, या शाळांना अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी कृती आराखडा व अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने समिती स्थापन केली असून समितीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

प्रश्नः- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मराठी भाषा विभाग, शासनाकडून काय प्रयत्न सुरू आहेत.

सुभाष देसाई :-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा  सुरु आहे.  सचिव /प्रधान सचिव,मुख्य सचिव, मी स्वतः आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावर केंद्र शासनाकडे वेळोवेळी  पाठपुरावा करण्यात आला आहे.

अभिजात भाषा घोषित करण्यासाठी लागणारे सर्व पुरावे उपलब्ध करुन करून दिले आहेत. नुकतीच खासदारांची बैठक झाली त्यातही मुख्यमंत्र्यांनी या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा करावा असे सांगितले. लवकरच शिष्टमंडळ केंद्रात भेट देणार आहे. या सर्व प्रयत्नांना लवकरच यश येईल असा मला विश्वास आहे.

प्रश्नः- केंद्र शासनाच्या त्रिभाषा सुत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत?

सुभाष देसाई : राज्यातील इतर आस्थापनांमध्ये मराठीचा पुरेसा वापर होत नाही असे दिसून आले. इतर राज्यात स्थानिक भाषेचा आग्रह धरला जातो. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर सकारात्मक उत्तर त्यांनी दिले आहे. त्यांच्या पत्रासोबतच सर्व आस्थापनांना स्थानिक भाषेचा वापर वाढवावा यासाठी पत्र देण्यात आले आहे. याशिवाय यासंदर्भात वारंवार परिपत्रके काढून बँका, विमा कंपन्या, पोष्ट, केंद्र शासनाची कार्यालये, गॅस कंपन्या इत्यादी कार्यालयांना त्रिभाषा सुत्रानुसार प्रादेशिक भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांवर केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय या सर्व कार्यालयांना त्यांच्या कार्यालयात मराठी भाषेचा वापर कोणत्या बाबींमध्ये करण्यात येतो याबाबत स्वयंघेाषणापत्र करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.

लोकाधिकार समितीच्या सदस्यांचे सहकार्य

या सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यांना फलक दर्शनी भागावर लावण्यास सांगण्यात आले आहे.  मराठी भाषेचा आग्रह करणाऱ्या लोकाधिकार समितीच्या सदस्यांचे यासंदर्भात सहकार्य घेण्यात येत आहे.

प्रश्नः-      आपल्याला मराठीतील कोणते साहित्य आवडते याबद्दल काय सांगाल?

सुभाष देसाई :-लहानपणापासून वाचनाची गोडी लावणारे शिक्षक मिळाल्यामुळे मी भरपूर वाचन करतो. विशेषतः चरित्र आणि प्रवास वर्णन या प्रकारातील साहित्य वाचायला आवडते.

प्रश्नः- मराठीतून शासकीय कामकाज करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत?

सुभाष देसाई :-प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रशासकीय विभाग व शासकीय कार्यालये यांना  शासन निर्णय व परिपत्रकांद्वारे सूचना देण्यात येतात. मी माझ्या विभागाच्या सर्व नस्त्यांवर मराठीतून टिपणी, अभिप्राय असावा यासाठी आग्रही असतो. इंग्रजीतून आलेल्या नस्त्या मी परत पाठवतो. शासकीय कामकाज, टिपणी, सादरीकरण हे मराठीतूनच असावे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या सोबतच ‘वापरतो मराठी’ असे असावे यासाठी आपल्यापासूनच ही सुरुवात होणे आवश्यक आहे.  आजही काही महामंडळे, आयोग यांचे काम इंग्रजीतून होते. यात हा विषय तांत्रिक आहे, किंवा इतर कारणे दिली जातात. मात्र हे दस्त देखील मराठीतून तयार व्हायला पाहिजेत. इग्रजी, हिंदी भाषा वापरण्यास विरोध नाही मात्र प्रथम वापरण्याची भाषा म्हणून मराठीचाच उपयोग झाला पाहिजे.

प्रश्नः- भाषा संवर्धनासाठी कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत?

सुभाष देसाईः- मराठी भाषेची थोरवी नव्या पिढीला कळावी आणि शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या सहकार्यांने काही उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.  पुस्तकांचे गाव सारखी चळवळ सुरु केली आहे. तीन चार तास  लांबच्या रेल्वे प्रवासात प्रवाश्यांना मराठी पुस्तके वाचायला मिळावी यासाठी वाचनदूत ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या वेळेत प्रवाशांना गाडीत मराठी पुस्तक दिली जाणार आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करुन तरुणाईला यात सामावून घेतले जाणार आहे. विविध मराठी मंडळांच्या सहकार्याने राज्यभरात मराठी वाचन कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

प्रश्नः- या मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने काय आवाहन कराल?

सुभाष देसाई :-मराठी भाषा संवर्धनाचे काम हे केवळ पंधरवड्यापुरते सिमीत राहू नये तर ते रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग बनावा. आपल्या स्तरावर प्रत्येक नागरिकाने यासाठी सजग राहून काम करावे. आपण जात असलेल्या दुकानाची पाटी मराठीत लावण्याबद्दल दुकानदारास प्रेमाने सांगावे. मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्याची  जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे.

***

शब्दांकन

अर्चना शंभरकर

वरिष्ठ सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय