सिल्लोड मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव निधी आवश्यक – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. ५ : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी लागणारा निधी लवकर मिळावा, अशी सूचना महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मांडली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अजिंठा घाटात रखडलेल्या कामासंदर्भात तसेच दलित वस्ती कार्यक्रम तात्काळ मार्गी लागण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

रस्ता रूंदीकरणाचा विषय मार्गी लावावा

सिल्लोड मतदारसंघातील जगप्रसिध्द अजिंठा लेणी येथे देश विदेशातून मोठ्या  प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असतात. यामुळे जळगाव-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मोठ्या प्रमाणावर मोठ्या वाहनांची वाहतूक असते. हा रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. केंद्र सरकारने रस्त्याचे रुंदीकरण करण्याकरिता मंजुरी दिलेली असून रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी निधीची देखील उपलब्धता करुन दिलेली आहे. रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झालेले आहे. केवळ अजिंठा घाटामधील आणि चौका घाटातील  काही भागाचे काम वन विभागाच्या परवानग्याअभावी तीन महिन्यापासून रखडले आहे. याबाबत तातडीने बैठक आयोजित करुन रस्ता रूंदीकरणाचा विषय मार्गी लावावा, अशी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री  सुभाष देसाई यांच्याकडे मांडली .

‘जिल्हा नियोजन समिती’तून मिळावा निधी…..

जिल्हा नियोजन समितीमधून मतदारसंघाच्या विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री  सुभाष देसाई यांच्याकडे सूचना मांडली आहे. त्यात दलित वस्ती कार्यक्रमासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देणे. मतदारसंघातील विकासकामांसाठी गौणखनिज स्वामित्व धनाच्या हिस्स्यातील जास्तीतजास्त रक्कम मिळावी अशा मुद्यांचा समावेश आहे.