ज्येष्ठ विचारवंत व संपादक मा. गो. वैद्य यांचे निधन

Image

नागपूर,
ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांचे शनिवार १९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३.३० वाजता निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले धनंजय, रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन, श्रीनिवास, शशिभूषण व हिंदू स्वयंसेवक संघाचे सह संयोजक डॉ. राम, स्नुषा रेवती, अस्मिता, वैजयंती, नातवंड व मोठा आप्तपरिवार आहे. अन्त्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर- ८०, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-२२ येथून निघेल व अंबाझरी घाटावर अन्त्यसंस्कार करण्यात येईल.

मा. गो. वैद्य यांचा जन्म ११ मार्च १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी झाला. त्याच गावात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण तत्कालीन नील सिटी हायस्कूल म्हणजे विद्यमान दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात तसेच महाविद्यालयीन शिक्षण मॉरिस कॉलेज येथे झाले. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले मा. गो. वैद्य यांनी मॅट्रिकपासून इंटर आर्ट्सपर्यंत प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केल्या. बीएची परीक्षा संस्कृत विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली व त्यांना सरस्वतीबाई कोलते सुवर्णपदक तसेच एमए परीक्षेत त्यांना दाजी हरि वाडेगावकर सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. १९४६ ते १९४९ या काळात त्यांनी न्यु ईरा हायस्कूल, न्यु इंग्लिश स्कूल, कुर्वेज न्यु मॉडेल या संस्थांमध्ये शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर हिस्लॉप कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली.
 
 
 
१९६६ साली ते तरुण भारताच्या संपादक विभागात रुजू झाले. त्यानंतर १९७० ते १९८३ या काळात मुख्य संपादकपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यानंतर तरुण भारत वृत्तपत्राचे संचालन करणाèया श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालक म्हणून त्यांनी १९८३ ते १९८५ या काळात यशस्वीरीत्या काम पाहिले. १९८९ ते १९९६ या काळात श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्यातील लेखन कौशल्य आणि जबाबदारी सांभाळण्याची हातोटी लक्षात घेता, त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाली. १९७८ ते १९८४ या कालावधीत आमदार म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
 
 
याशिवाय नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच सलग दहा वर्षे ते नागपूर विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य होते. यासोबत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा तेवढाच राबता होता. १९७७ ते १९९९ या काळात ते भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, अखिल भारतीय प्रवक्ते, २००८ पर्यंत ते अ. भा. कार्यकारी मंडल निमंत्रित सदस्य अशा निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
 
 
लेखन हा त्यांचा आत्मा होता. त्यामुळे हिंदुत्व : जुने संदर्भ, नवे अनुबंध (मराठी व हिंदी), हिंदू संघटन : शक्यता, आवश्यकता व सफलता (मराठी), हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र (मराठी), शब्दांच्या गाठीभेटी (मराठी), राष्ट्र, राज्य आणि शासन (मराठी), ज्वलंत प्रश्न : मूलगामी चिंतन (हिंदी), रविवारचा मेवा (मराठी) द्वितीय आवृत्ती, प्रतिभेचे चांदणे, काश्मीर : समस्या व समाधान (मराठी व हिंदी), आपल्या संस्कृतीची ओळख (मराठी), अभिप्राय (मराठी), राष्ट्रीयत्वाच्या संदर्भात : हिंदू, मुसलमान व ख्रिस्ती (मराठी), शब्ददिठी शब्दमिठी (मराठी), मेरा भारत महान (मराठी, हिंदी व इंग्रजी), संघ : काल, आज आणि उद्या (मराठी व हिंदी), संघबंदी, सरकार आणि श्रीगुरुजी (मराठी), धर्मचर्चा (हिंदी), सुबोध संघ (मराठी व हिंदी), ठेवणीतले संचित (भाष्य लेखाचा संग्रह), रंग माझ्या जीवनाचे (मराठी) आदी विविध विषयांवरील साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांच्या जीवनात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात महाराष्ट्र शासनाचा ‘महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’, नागपूर विद्यापीठाचा ‘राष्ट्रसंत तुकडोजी जीवन गौरव पुरस्कार’, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शोध संस्थान, दिल्लीचा ‘बौद्धिक योद्धा’ सन्मान, राजमाता विजयाराजे सिंधिया पत्रकारिता सन्मान ग्वालियर, श्यामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानचा ‘जीवन गौरव व राष्ट्रसेवा’ पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा ‘गणेश शंकर विद्यार्थी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’, महाराष्ट्र विधान मंडळाचा ‘कृतज्ञता सन्मान पुरस्कार’, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार’, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा ‘महामहोपाध्याय’ सन्मान, मुंबई पत्रकार संघाने २०१७ मध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविले, यासोबतच माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता एवं संचार विश्वविद्यालयाने विद्या वाचस्पती (डी. लिट्.) ही उपाधी त्यांना २०१८ मध्ये बहाल केली.