लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 16 : लातूर जिल्ह्यातील पानगाव (ता. रेणापूर) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात पानगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासा संदर्भात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, आमदार धीरज देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.मुंडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी महाराष्ट्रात फक्त नागपूर, मुंबई व पानगाव येथेच ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पानगाव येथील चैत्यभूमी परिसरात प्रतिदिन हजारोंच्या संख्येने अनुयायी अस्थीदर्शनासाठी येतात, त्यामुळे येथील स्मारकाचा विकास करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठीचा विकास आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देशही श्री.मुंडे यांनी यावेळी दिले. या स्मारकाच्या विकासकामांचे भूमीपूजन 14 एप्रिलला करण्याचा मानस असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, पानगाव येथील स्मारकाचा विकास कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करून अनुयायांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्मारकाच्या विकासासाठी जागा कमी पडली तर तेथील बाजार समितीची जागा उपलब्ध करून देऊ तसेच या स्मारकाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा व आवश्यक तो निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासन सहकार्य करेल, असेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.