राज्यपालांनी केला प्लाझ्मा, रक्तदात्यांसह, पोलिस, अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार

राजभवन येथे ३४ कोरोना योद्धा सन्मानित

मुंबई, दि. 16 : देशात कोरोनाच्या केसेस एकावेळी दरदिवशी ९४,००० मिळत होत्या. आज हीच संख्या ३०,००० पेक्षाही कमी झाली आहे. या संकट काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांसह सामान्य माणसांनी आपापल्या परीने खूप मोठे योगदान दिल्यामुळेच देश कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याच्या निर्णायक स्थितीत आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

कोरोना काळात अनेकदा रक्तदान व प्लाझ्मा दान करून लोकांना जीवनदान देणाऱ्या जनसामान्य कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रात निरपेक्षतेने कार्य करणाऱ्या ३४ कोरोना योद्ध्यांचा बुधवारी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे हृद्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीतर्फे आयोजित कोरोना योद्ध्यांच्या या सत्कार सोहळ्यामध्ये पत्रकार, संपादक, अन्नधान्य व मास्क वितरण करणारे समाजसेवी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व पोलीस कर्मचारी यांचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार राजेंद्र साळसकर, बांधकाम व्यावसायिक राहुल हजारे तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी आहार तज्ज्ञ डॉ.नुपूर कृष्णन, रेल्वे कामगार नेते डॉ. जनार्दन देशपांडे, पनवेलच्या निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू, पुरुषोत्तम पवार, मानसिंग चव्हाण, संजय कदम, सुरेश ढोमे, संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्टचे विश्वस्त हेमंत सामंत, सरस फाऊंडेशनचे अध्यक्ष, पंकज मेहतर, स्वाती जाधव, नितीन कोलगे, राजीव काळे, गणेश आमडोस्कर, थेलेसेमिया निर्मूलन कार्यकर्ते जयराम सुधाकर नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत म्हात्रे, रक्तदाते प्रशांत घाडी, विक्रम यादव, किरण म्हात्रे, विश्वास दाते, दीपक घाडीगावकर, हनुमंत कुमार, साईनाथ गवळी, शशिकांत मुबरे, संदेश पुरळकर, गणेश बाळकृष्ण शिंदे, जयकुमार सातलेकर, रविंद्र कदम, गजानन नार्वेकर, अग्निशमन कर्मचारी भावेश  पवार, अमृता चव्हाण, ऋषीकेश साबळे, संजय कुलकर्णी, विकास येवले व संतोष शेते यांचा यावेळी कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.