परभणीतील शाळा दोन डिसेंबरपासून 

पहिल्या टप्यात दहावी व बारावीचे वर्ग

परभणी : महापालिका क्षेत्र  वगळता जिल्ह्यात टप्प्याटप्याने प्रथम इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून व त्यानंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी ( २२ नोव्हेंबर ) काढलेल्या आदेशात म्हटले आहे.दरम्यान, २५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे. महानगर पालिका क्षेत्रातील वर्ग सुरू करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी म्हटले आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू कराव्यात असे म्हटले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणीही करावी, असेही म्हटले होते. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने शाळा सुरू करण्याबाबत साशंकता निर्माण होत होती.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळांतील दहावी तसेच महाविद्यालयातील बारावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून सुरू करावेत. त्यानंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. परभणी महानगर पालिकेसह जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी २५ नोव्हेंबरपासून शाळेत पूर्णवेळ उपस्थित रहावे. विद्यार्थी उपस्थितीकरिता पालकांचे संमतीपत्र घेणे आवश्यक करण्यात आले आहे. शाळेत प्रत्यक्ष उपस्थिती करिता संमती नसणार्‍या विद्यार्थांकरिता ऑनलाईन वर्ग चालू ठेवावेत, शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. २६ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण शाळेच निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्याचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, एखाद्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍याचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ती शाळा पाच दिवस बंद ठेवून निर्जंतुकीकरण करून ती शाळा परत चालू करावी, प्रत्येक शाळेत हँडवॉश मशीन, थर्मल गन, ऑक्सीमीटर उपलब्ध करणे व पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आठवड्यातून किमान दोनवेळा शाळा निर्जंतुकीकरण करणे हे स्थानिक शाळा व्यवस्थापना बंधनकारक करण्यात आले आहे. दोन डिसेंबरपासून मानवविकास बस प्रवास फेर्‍या सुरू कराव्यात, असेही श्री. मुगळीकर यांनी आदेशात म्हटले आहे.