द्विशतकाकडे झेपावणारी मराठी रंगभूमी

मराठी रंगभूमी दिनानिमित्त विशेष लेख

5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे कै. विष्णूदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या आख्यानवजा मराठी संगीत नाटकाची सुरुवात केली. सांगलीच्या अधिपतींनी दिलेल्या आदेशानुसार हा नाट्य प्रयोग साकारण्यात आला होता. हा प्रयोग पूर्वीच्या नाट्य प्रकारापेक्षा सर्वच दृष्टिने आधुनिक कलात्मक व सुसंस्कारित असा होता. या प्रयोगामुळे विष्णूदास भावे यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जाते. याचे महत्त्व आणि औचित्य जपण्यासाठी आपण दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा करतो. आज जवळपास 177 वर्षाची ही ऐतिहासिक घटना तमाम मराठी रंगकर्मीसाठी एखाद्या सणासारखीच आहे. दरम्यानच्या काळात मराठी रंगभूमीवर बरीच स्थित्यंतरे घडली. त्यास सामोरे जात मराठी रंगभूमीने मोठी झेप घेतली. त्याचा थोडक्यात आढावा.

प्राचीन किंवा अर्वाचीन युरोप खंडातील कोणत्याही राष्ट्रात जेवढी नाट्यरुपी ग्रंथसंपदा दिसते. तेवढी ती भारतात देखील आहे. यावरुन भारतीय नाट्यशाखा निश्चितच समृद्ध होती, हे आपल्या लक्षात येते. अगदी आधुनिक मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तरी आपल्या लक्षात येते की, मराठी रंगभूमीला 177 वर्षांची द्विशतकाकडे झेपावणारी भरभक्कम परंपरा आहे. 5 नोव्हेंबर 1843 पासून 2020  पर्यंतच्या 177 वर्षांच्या कालखंडाचे 1843 ते 1950 अशी 107 वर्षे व 1950 ते 2020 अशी 70 वर्षे असे दोन विभाग करुन त्याचा आढावा घेतला असता हे स्पष्ट की, या दोन्ही काळातील प्रत्येक दशकामध्ये मराठी रंगभूमी प्रगत व अधिकाधिक समृद्ध होत गेली आहे.

सुरुवातीच्या शतकी कालखंडात किर्लोस्कर, देवल, श्री.कृ.कोल्हटकर, खाडिलकर, वरेरकर, शं.प. जोशी, वीर वामनराव जोशी, शुक्ल यांनी पौराणिक, सामाजिक विषय आपल्या नाटकांतून हाताळले. 1930 नंतर महाराष्ट्रात रंगभूमीवरील नाट्य प्रयोगामध्ये नावीन्य निर्माण झाले. तसे पाहता रंगभूमीवरील प्रयोगाच्या बाबतीत नाविन्य निर्माण करुन रंगभूमी वास्तववादी करण्याचे काम वरेरकरांनी 1930 पूर्वीच केले होते. या दरम्यान 3 मे 1913 ला राजा हरिश्चंद्र हा मूकपट आणि 14 मार्च 1931 ला ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट आला. सहाजिकच नाटकातील कलावंत मंडळी या नव्या क्षेत्राकडे वळली. बोलपटाचे नवयुग सुरु झाले. तरीही 1933 च्या आसपास काही मंडळी काहीतरी वेगळे करण्याचा मानस करुन कामाला लागली. यात वर्तक, काणेकर, आतळेकर आदींचा समावेश होता. आचार्य अत्रे यांनीही आपल्या नाटकातून वेगळेपण दाखवले. तसेच मो.ग.रांगणेकर यांनी ‘कुलवधू या आपल्या नाटकारद्वारे एक वेगळा प्रयत्न केला. या दरम्यान तात्यासाहेबांच्या म्हणजे वि.वा.शिरवाडकरांच्या आगमनाने नाट्यसृष्टीला चैतन्य लाभले. 1943 मध्ये सांगली येथे शतसांवत्सरिक रंगभूमीचा सोहळा झाला. या सोहळयाने रंगभूमीला प्रेरणा, उर्जा, नवतेज दिले. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात महाराष्ट्रात नाटकाचा उपयोग स्वराज्याच्या आंदोलनासाठी करण्यात आला. हे आंदोलन अधिक तीव्र  कसे होईल. लोकजागृती कशी होईल, यासाठी नाटकाचा वापर झाला. स्वातंत्र्याची ज्योत नाटकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचा प्रयत्न झाला.

स्वातंत्र्योत्तर रंगभूमी

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशातील नाट्यकला चौफेर वाढली. या कलेला सरकारने तसचे नाट्य रसिकांनी आश्रय दिला, प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यांनंतरच्या पुढील सहा दशकांत मराठी रंगभूमीवरील अनेक प्रकारचे बदल झाले. प्रयोगही झाले त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या मराठी रंगभूमीचा विचार करताना या काळातील लेखकांनी केलेल्या विविध प्रयोगांचा विचार करणे महत्वाचे ठरते.

महत्त्वाचे म्हणजे या 1950 ते 1970 या काळातील नाटककांरांनी थोडेसे धाडस दाखवून पूर्वीच्या काळातील पौराणिक, सामाजिक, राजकीय विषयांचा आक्रास्तळेपणा नष्ट केला. नाट्य रसिकांना निखळ मनोरंजन दिले. या कालावधीत लेखकांनी चौफेर लेखन केले ते एकाच प्रवाहात अडकले नाहीत. या काळात व्यावसायिक, प्रायोगिक लोकरंगभूमी, बालरंगभूमी एकांकिका अशा सर्वच नाट्य प्रकारांचे लेखन झाले. व्यावसायिक नाटकासोबत प्रायोगिक, समांतर नाटक होऊ लागली. वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, पु.भा.भावे, गो.नि.दांडेकर, बाळ कोल्हटकर,, रत्नाकर मतकरी, विद्याधर गोखले, पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी या काळात विपुल लेखन केले आणि मराठी रंगभूमीला समृद्धी दिली.

वादळी कालखंड

1970 ते 80 या दशकात मराठी रंगभूमीवर मोठी वादळं झाली. किंबहुना हा कालखंड रंगभूमीसाठी वादळी कालखंड ठरला. रंगभूमीसाठी वादळ निर्माण होणे, ही बाब काही नवी नाही. भाऊबंदकी त्याआधीचे कीचकवध या नाटकांसाठी 1910 मध्ये प्रेस ॲक्टने बळी घेतला. कीचकवधात जुलमी राज्यकर्त्यांचा वध दाखवला म्हणून ते प्रेस ॲक्टच्या कहरात दगावले, भाऊबंदकीत राज्यकर्त्यांचा केवळ निषेध असल्यामुळे ते बचावले. अशी उदाहरणे आहेत. मात्र या 70 ते 80 च्या दशकात नवीन दृष्टीने विचार करावयास प्रेरित केले. वसंत कानेटकरांनी आपले अजरामर नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिले. तसेच तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’ लिहून वादळ निर्माण केले. या नव्या प्रयोगाने प्रायोगिक नाटकांकडे पाहण्याची दृष्टी दिली. या काळात सखाराम बाईंडर, एक शून्य बाजीराव, महानिर्वाण, माता द्रौपदी, लोककथा, 78 वासनाकांड, गार्वो, नटसम्राट, हमीदाबाईची कोठी, अलवरा डाकू, टिळक आगरकर आदी नाटके प्रेक्षकांच्या समोर आली.

तसेच या काळात मराठी रंगभूमीवर एक नवीन गोष्ट झाली ती म्हणजे मराठीतील काही नाटके परभाषेत गेली तर काही परभाषेतून मराठीत आली. प्रामुख्याने बादल सरकार, गिरीष कर्नाड, मोहन राकेश यांच्या नाट्यकृती मराठीत यांव्यात, यासाठी महाराष्ट्र तसेच केंद्र शासनानेही त्यांच्या पातळीवर बरीच मदत केली. 1980 ते 1990 या दशकातील नाटके केवळ त्या त्या दशकापुरतीच मर्यादित न राहता आजही रंगभूमीवर आपले आस्तित्व दाखवत आहेत. याचे संपूर्ण श्रेय त्या नाटककारांनाच जाते. महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी, वि.वा .शिरवाडकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, मधुकर तोरडमल, जयवंत दळवी, अशोक पाटोळे, शेखर ताम्हाणे, वसंत सबनीस, सई परांजपे, प्र.ल.मयेकर. प्रेमानंद गज्वी यांनी व्यावसायिक यश मिळविले.

20-25 वर्षानंतरही म्हणजे आजही यांची नाटके व्यावसायिक पातळीवर यशस्वी होताना दिसतात. तसेच प्रायोगिकतेला महत्व देऊन नवीन प्रयोग केले. पुलंचे वाऱ्यावरची वरात, असा मी असा मी, प्र.के. अत्रेंचे तो मी नव्हेच अशी उदाहरणे सांगता येतील की ज्यांचा पगडा आजही प्रेक्षकांवर आहे. या वेगवेगळ्या लेखकांनी आपापल्या नाटकांतून विविध विषयांना हात घालत समाजाला जे पाहिजे ते लिहिले. आणि समाजमताचे प्रतिबिंब नाटकांतून आपल्या समोर उभे राहिले.

यशस्वी प्रयोग

1990 ते 2010 या काळात मराठी रंगभूमीची प्रगती पाहता एक संपूर्ण वेगळा लेख होऊ शकतो तरी त्यांचा थोडक्यात परामर्ष घेता झालेली नेत्रदीपक प्रगती लक्षात येते. या 20 वर्षांच्या काळात अनेक नामवंत नाटकारांनी दिग्दर्शकांनी आपली वेगवेगळी शैली वापरुन रंगभूमीवर विविध प्रयोग केले. व्यावसायिक पासून ते प्रायोगिक अशा स्तरांवर नवनवीन प्रयोग या काळात पहावयास मिळाले. कोणी महानाट्य तर कोणी त्रिनाट्य तर कोणी दीर्घांक असे वेगवेगळे नाट्य प्रयोग यशस्वीरित्या साकारले. तसेच काही नाटकांनी गदारोळही केला. थेट संसदेतही याचे पडसाद उमटले होते. तसेच या दशकात दूरचित्रवाहिन्यांचे जे आगमन झाले त्यांच्या स्पर्धेत उत्तमोत्तम नाट्यनिर्मिती देखील झाली आणि प्रेक्षकांनी बऱ्याच अंशी नाटकाला पसंती दिली यासाठीचे श्रेय सर्वांनाच देणे उचित ठरेल कारण चार-दोन नावे घेतली तर ते इतरांवर अन्याय होईल.

विविध चित्रवाहिन्यांच्या स्पर्धेतही आपल्या मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी रंगकर्मी मंडळींनी रंगभूमीची सेवा चालू ठेवली आहे. आजही अनेकविध प्रयोग होत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील चैतन्य टिकून आहे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सर्व बाजूंनी रंगभूमीची प्रगती होण्यासाठी ही रंगकर्मी मंडळी झटत आहे. ही आशादायी बाब आहे. 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे कै. विष्णूदास भावे यांनी सीता स्वयंवर या आख्यानावर आधारित नाट्य प्रयोग करुन मराठी रंगभूमीचे बीज रोवले. या बिजाचा आता बहुविशाल असा वटवृक्ष झाला असून त्याच्या शाखा सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्याच्या छत्रछायेत आपण रंगकर्मी मंडळी रंगभूमीची सेवा करत आहोत. निश्चितच भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आपल्या मराठी रंगभूमीचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले जाईल, असेच कार्य मराठी रंगभूमीचे आहे.

2020 या वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली रंगभूमी ठप्प झाली. कलावंतांसह तंत्रज्ञ व लहान कामगार ज्यांचे आयुष्य नाटकावर, रंगभूमीवर आहे. त्यांना मोठा फटका बसला अर्थातच जागतिक पातळीवरच कोरोनाचा कहर आहे. अशी कितीही संकटे आली तरी आमचा कलावंत, तंत्रज्ञ हा फिनिक्स पक्षासारखी परत मोठी झेप घेईल यात शंका नाही. कोरोनाने बळी घेतलेल्या जागतिक तसेच आपल्या मराठी रंगभूमीच्या दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली.सर्वांना  मराठी रंगभूमीच्या शुभेच्छा…

………………………

डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)