सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम

वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस कर्मचारी संगीता ढोले

मुंबई, दि. 22 : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ..

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

संगीता ढोले

वाशिम पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले या सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम करत आहेत. भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या ढोले यांचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे.

नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.