छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता – मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार हायटेक प्रशिक्षण

शेतीमित्र विजय चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश

छत्रपती संभाजीनगर,२ मार्च / प्रतिनिधी :-वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर  येथे  विद्यापीठाच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास  शासनाने मान्यता दिली आहे. कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांच्या नावाने एक मार्च २०२४ रोजी या निर्णयाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना  या केंद्रातच हायटेक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार असून उच्च तंत्रज्ञान कृषी प्रशिक्षण दिले जाणार आहे. खुलताबाद येथील पत्रकार शेतीमित्र विजय चौधरी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शेतीमित्र  पत्रकार विजय चौधरी यांनी यापूर्वीही १८ जानेवारी २०२० रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दादा भुसे  यांच्या अध्यक्षतेखाली  “शेतीविषयक धोरण, योजनेबाबत चर्चा उपाययोजना” याविषयी आयोजित बैठकीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाश्वत शेती विकास करण्यासाठी ‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हायटेक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्याची मागणी  केली होती. तसेच  २९ ऑगस्ट २०२३ रोजी शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसोबत मुंबई मंत्रालयात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर येथे तळेगाव दाभाडीच्या धर्तीवर हायटेक शेतकरी प्रशिक्षण केंद्र व व्हिजिटेबल हब सुरू करण्याची  आग्रही मागणी शेतीमित्र विजय चौधरी यांनी केली होती. पत्रकार विजय चौधरी यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने ७ व ९ सप्टेंबर २०२३ रोजी संशोधनात्मक व शेतीमध्ये अधिक नफा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी विकासात्मक प्रस्ताव तयार करून कृषि विभागाकडे जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळा, उद्यान विद्या प्रशिक्षण केंद्र, फळ संशोधन केंद्र, हरितगृह व शेडनेट गृह यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. 

याविषयी १६ फेब्रुवारी  २०२४ रोजी वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी चर्चा करून पाठपुरावा केला होता. 

या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली ६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर  येथे  विद्यापीठाच्या  कृषि तंत्र विद्यालय पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाच्या १४ एकर जमिनीवर शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी  पंजाब नॅशनल बँक व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँक व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार कृषि तंत्र विद्यालय पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र  या केंद्राची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी देण्यात येणारी जागा ही प्राधान्याने शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वापर करण्यात यावी. इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही.

हे प्रशिक्षण केंद्र वरदान

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हायटेक प्रशिक्षण देण्यासाठी या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रातच आम्ही उच्च तंत्रज्ञान कृषी प्रशिक्षण घेऊ.आम्ही काही अतिरिक्त पॉलीहाऊस आणि पायाभूत सुविधांचीही मागणी करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण केंद्र वरदान ठरू शकते. 

  – रावसाहेब भागडे,

महासंचालक, 

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद.

शाश्वत उत्पन्नाची हमी

छत्रपती संभाजीनगर ला शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे. हि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरला हायटेक शेतकरी प्रशिक्षण केंद्र मंजूर झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी तळेगाव दाभाडे या ठिकाणी जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ व पैशाची बचत होऊ शकेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर येथेच प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होईल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हायटेक शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतीशी निगडित विविध पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात होऊ शकतील. तसेच त्यांच्या शाश्वत उत्पन्नाची हमी मिळू शकते.

– विजय चौधरी,

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार विजेते पत्रकार, खुलताबाद.