मलकापूरात लक्झरी बसचा भीषण अपघात; ६ जण ठार तर २५ गंभीर जखमी

मलकापूर,२९ जुलै /प्रतिनिधी :- अमरनाथहून हिंगोली जाणाऱ्या लक्झरी बसला एका दुसऱ्या भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने समोरुन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अतीगंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना बुलढाणा येथे हलवण्यात आलं आहे. मात्र, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाण पुलावर आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

हिंगोलीतील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस अमरनाथहून ४० प्रवाशांना घेऊन हिंगोलीकडे परत जात होती. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या बसने हिंगोली जाणाऱ्या बसला समोरुन धडकी दिली.

या अपघातात हिंगोलीला परत असलेल्या बस मधील पाच प्रवासी हे जागीच ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. यामुळे महामार्गावर काही काळ चक्का जाम झाला होता.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.