दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा

आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे – मंत्री दीपक केसरकर

मुंबई,२९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना उद्या शुक्रवार दि. 1 मार्च 2024 पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 10 वी साठी एकूण 5086 केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 23 हजार 272 शाळांमधून एकूण 16 लाख 09 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती, शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

            परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.