जिल्हा परिषदांच्या शाळेतच गुणवत्ता ठासून भरलेली आहे : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

“जिल्हा शिक्षक पुरस्काराने” औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या १७ शिक्षकांचा सन्मान

औरंगाबाद,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे.जिल्हा परिषद शाळेतच भौतिक सुविधा,गुणवत्तापूर्ण पात्रताधारक शिक्षक व गुणवत्ता ठासून भरलेली आहे.या शाळेबद्दल वाईट ऐकून मन खिन्न होते.विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्रात घडवा.शाळा सर्वांगीण समृद्धीचे केंद्र बनले पाहिजे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबतच समाजाची जडणघडण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.


      औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने “जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण” सोहळ्यात विशेष निमंत्रित अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. समाजात अनेक चांगल्या लोकांची विविध क्षेत्रात आवश्यकता आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षकांनी उचलावी.
       जिल्ह्यातील ९ प्राथमिक,७ माध्यमिक,१ विशेष व ५ उपक्रमशील शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन तापडिया नाट्यमंदिर येथे सोमवार ५ रोजी करण्यात आले होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की,जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव कमी प्रमाणात येतात.चांगले शिक्षक प्रस्तावाविना वेचण्याची प्रक्रिया यावर्षीपासून सुरू केली आहे.विद्यार्थ्यांना आकर्षक,आनंददायी वाटेल असे शिक्षण शिक्षकांनी द्यायला हवे.
       प्रास्ताविकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती,विद्यार्थी गुणवत्ता,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी व शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात सर्वंकष चळवळ सुरू झाल्याचे नमूद करत जिल्हयात एमएनएस,नवोदय पात्र ठरवणाऱ्या विविधांगी कर्तृत्ववान हि-यांची खाण निर्माण करणा-या शिक्षकरत्नांचे कोंदण आहे.या शिक्षकांची निवड यावर्षी शासन निर्णयातील निकषानुसार करण्यात आली असून त्या गुरूजनांचा सन्मान करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन केले.
     यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कलिमोद्दीन शेख,आदर्श जिल्हा परिषद शाळा जरेवाडी चे मुख्याध्यापक संदीप पवार यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.रागीणी शिंदे,सुभाष शिंदे व प्रशांत देसाई यांनी गायलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा या बहारदार महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
    पुरस्कारप्राप्त शिक्षकांमधून सनी गायकवाड,मनोहर लबडे,वर्षा देशमुख,नितीन गबाले,प्रदीप सोनार यांनी मनोगत व्यक्त केले.
   याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कलीमोद्दीन शेख,उपशिक्षणाधिकारी संगीता सावळे,लईक सोफी,जरेवाडीचे मुख्याध्यापक संदीप पवार,गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील,समाधान आराख,हेमंत उशीर,दिपाली थावरे,विलास केवट,अनिल पवार,विजय दुतोंडे,दिलीप सिरसाट,श्रीराम केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांनी केले.सूत्रसंचलन प्रवीण लोहाडे यांनी केले.उपशिक्षणाधिकारी संगीता सावळे यांनी आभार मानले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्ताराधिकारी रमेश ठाकूर,संगीता गायकवाड,प्रशांत हिवर्डे,राजेश हिवाळे,राजेश महाजन जालम चौरे,मनीषा वाशिंबे,कल्पना पदकोंडे,विद्या सुधाकर सोनवणे,छाया पांगारकर आदींनी परिश्रम घेतले.
    सदर दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हाभरातील शिक्षक,पालक,ग्रामस्थ,शिक्षण प्रेमी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


    कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन करून ऐनवेळी मुंबईला तातडीची बैठक निघाल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत.
    २०२२-२३ च्या पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना तिरंगी पगडी उपरणे,शाल,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.पुरस्कार प्राप्त शिक्षक संवर्गनिहाय पुढीलप्रमाणे
      प्राथमिक शिक्षक  (९) :
वर्षा बाबुराव देशमुख (केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा,औरंगाबाद) शिवाजी लक्ष्मण डुकरे (प्राथमिक शाळा भायगाव,वैजापूर) मनोजकुमार सुखदेव सरग (प्राथमिक शाळा शेवता,पैठण) भगवान गुलाबराव जगताप (प्राथमिक शाळा देवळाणा,कन्नड) सनी सुभाष गायकवाड (प्राथमिक शाळा गाजरमळा,गंगापूर) दादाराव नरसिंग सोनवणे (केंद्रीय प्राथमिक शाळा निल्लोड,सिल्लोड) सदाशिव अर्जुनराव बडक (प्राथमिक शाळा वाकोद,फुलंब्री) दत्तात्रय दिनकर मरळ (प्राथमिक शाळा धामणगाव,खुलताबाद) दीपक सुभाष महालपुरे (प्राथमिक शाळा पळाशी,सोयगाव)
       माध्यमिक शिक्षक (७) :
विद्या रामभाऊ सोनगिरे (प्रशाला सातारा,औरंगाबाद) गणेश लक्ष्मणराव सुरवाडकर (प्रशाला शिवराई,वैजापूर) ताराचंद उत्तमराव हिवराळे (प्रशाला मुलांची पैठण,पैठण) ब्रम्हदेव मारुतीराव मुरकुटे (प्रशाला अंबेलोहळ,गंगापूर) देविदास पितांबर बाविस्कर (प्रशाला शिवना,सिल्लोड) धनराज वसंत चव्हाण (प्रशाला जातेगाव,फुलंब्री) प्रदीप धनराव सोनार (प्रशाला राजेराय टाकळी,खुलताबाद)
      विशेष शिक्षक (१) :
जगन भागाजी खंडागळे (प्रशाला कन्या पैठण,पैठण)
      विशेष पुरस्कार (५) :
बापु सुकदेव बावीस्कर (प्राथमिक शाळा,दत्तवाडी, केंद्र – सोयगांव,ता.सोयगांव) शैलेष प्रभाकर जावळे ( प्राथमिक शाळा, बोरगांव,केंद्र- अंबेलोहळ, ता.गंगापूर.) नितीन दत्ताप्पा गबाले (केंद्रीय प्राथमिक शाळा, गारखेडा नं.१,ता.औरंगाबाद) मनोहर भास्कर लबडे (प्राथमिक शाळा,निमगांव,केंद्र – शिऊर, ता.वैजापूर) मुरलीधर पोपट लगड (प्राथमिक शाळा,आमसरी, केंद्र-शिवना, ता.सिल्लोड)