महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प घेऊया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमृत काळातील विकसित भारतासाठी संविधानातील कर्तव्याचे पालन करूया! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,२६ जानेवारी / प्रतिनिधी :-प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या काळात संविधानाने सामान्य नागरिकाला  दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्यांचे पालन करून देशाला अमृतकाळात विकसित करण्याचे व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर  करण्याचा संकल्प करण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली. शेतकरी कल्याण व नागपुरसह विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कार्यरत असल्याची  ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरीक्त पोलीस आयुक्त  अश्वती दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती  मनोजकुमार सूर्यवंशी आदिंसह नागपुरातील विविध पदांवरील  केंद्र व राज्य शासनाचे सनदी अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती  शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे  350वे वर्ष असून त्यांनी  लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात राबवून रयतेचे राज्य निर्माण केले. तसेच, प्रभू श्रीरामचंद्रांनी  लोकशाही  संकल्पनेच्या आधारे रामराज्य  निर्माण केले होते. भारतीय प्रजासत्ताकाचे हे 75वे वर्ष साजरे करतांना संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्याचे पालन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षित अमृतकाळातील   विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशातील 25% जनता हे गरीबी रेषेतून बाहेर निघाली आहे. हा विश्व विक्रम ठरला आहे. स्टार्टअप, अवकाशक्षेत्र आदींमध्ये देशाने प्रगती केली आहे. या प्रगतीत महाराष्ट्राचा  वाटाही  मोलाचा आहे. देशाच्या जीडीपी मध्ये योगदान देणारा महाराष्ट्र परकीय गुंतवणूक आणण्यात, उद्योग क्षेत्रात, स्टार्टअप उद्योगात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. ही प्रगती महत्वाची असून शासन  शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान निधीद्वारे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांसह एकूण 12 हजार रुपये देण्यासह, कृषी सौर वाहिनी योजनेद्वारे शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि रोजगार वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरसह विदर्भात लॉजिस्टिक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून  आतापर्यंत  एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे. मिहान मध्ये देशातील प्रमुख 6 आयटी कंपन्यांपैकी 5 आयटी कंपन्या आल्या आहेत व मिहान येथे आयटी इकोसिस्टीम तयार होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 30  हजार कोटी पेक्षा जास्त  गुंतवणूक आली आहे व देशाची स्टील सिटी म्हणून हे शहर विकसित होत आहे. अमरावती जिल्ह्यात ‘पीएम मित्रा’ कार्यक्रमांतर्गत टेक्स्टाईल इकोसिस्टीम तयार होत आहे. नागपूर येथे महारोजगार मेळावा घेऊन विदर्भातील जवळपास 10 हजार युवकांना तीन दिवसात रोजगार देण्यात आला. विदर्भात पर्यटन क्षेत्रात विविधसंधी असून उपलब्ध  येथील व्याघ्र पर्यटनाकडे देश विदेशातील  पर्यटक आकर्षित होत आहेत.

नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील अंभोरा येथे 300 कोटींच्या खर्चातून जल पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विदर्भाची अयोध्या म्हणून ओळख असणाऱ्या रामटेक नगरीत रामटेक विकास आराखडा  पूर्ण करण्यात येत आहे. पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये सिंचन व्यवस्था  बळकट करण्यात येणार आहे.  या प्रकल्पाद्वारे  कृषी  विकासाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रोचा दुसरा फेज(टप्पा) सुरू झाला असून या द्वारे 43 कि.मी.ची  नवी मार्गिका व 33 मेट्रो स्टेशन उभारले जात आहेत.नागपूर शहरात एक हजार कोटींचे उड्डाणपूल तयार होत आहेत. मानकापूर येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येत असून ऑल्म्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी यंत्रणा उभी होत आहे.

पुढील तीन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या  सर्व बसेस  इलेक्ट्रिकवर चालतील. 250 बसेस घेण्यासाठी 137 कोटी रुपये मनपाला देण्यात आले आहेत.  शहरातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी  49  नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. मालमत्ता कर धारकांना शास्तीमध्ये 80 टक्के सूट देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. नागपूर शहर लवकरच टँकर मुक्त होणार असून मंगळवारी व गांधीबाग टँकर मुक्त झाले आहेत. नागनदी विकासाला, अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणाला सुरुवात झाली आहे. नागपूर सह विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून ह्या भागाचा भरघोस विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्बोधनानंतर श्री. फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिक , विविध क्षेत्रातील मान्यवर यांची भेट घेतली. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या  कवायतींचे त्यांनी निरीक्षण केले. नागपूर ग्रामीण पोलीसचे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक दीपक अग्रवाल यांच्या नैतृत्वात पथसंचन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी  डॉ. दीपक साळीवकर व महेश बागदेव यांनी केले.