क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

शौर्य पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा सत्कार

लातूर,२६ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामिगिरी करणारे प्रशासनातील अधिकारी, तसेच खेळाडू, ग्रामपाचायाती, उद्योग, विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. गडचिरोली येथे कार्यरत असताना उत्कृष्ट कामिगिरी केल्याबद्दल लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना शौर्य पदक जाहीर झाले असून याबद्दल ना. बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा) येथील शहीद जवान हवालदार श्रीधर व्यंकटराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच युद्धजन्य परिस्थितीमध्ये दिव्यांगत्व आलेले निलंगा तालुक्यातील मुदगड येथील हवालदार प्रशांत शिवाजी मुळे यांना 17 लाख रुपये रोख व ताम्रपट यावेळी ना. बनसोडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामासाठी निलंगा विभागातील शाखा अभियंता सुनील बिराजदार, लातूर विभागातील शाखा अभियंता लोभाजी घटमल आणि लातूर मंडळातील कनिष्ठ लिपिक गजानन चव्हाण यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.  माहिती तंत्रज्ञान विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पोंदे, महसूल विभागात वाहनचालक पदावर उत्कृष्ट सेवेबद्दल लातूर तहसील कार्यालयातील वाहनचालक गोविंद शिनगीर यांचाही ना. बनसोडे याच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज पुरस्काराबद्दल लातूर येथील एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील रेवती विजय माळी, लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रेशमा मोहसीन शेख आणि दयानंद महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील तीन उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले असून याबद्दल बोरसुरी डाळ उत्पादक संघाचे धोंडीराम रोडे, पटडी चिंच उत्पादक संघाचे उमाकांत कुलकर्णी आणि कास्ती कोथिंबीर उत्पादक संघाचे नामदेव माणिक माने यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच कृषी अधिकारी पदावर उत्कृष्ट कामगिरी केलेले शिवाजी तांदळे, मंडळ कृषी अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा दिलेले विकास लटूरे आणि कृषी पर्यवेक्षक पदावर उत्कृष्ट सेवेबद्दल सुर्यकांत लोखंडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती तनिष्का शिवानंद पाटील, राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त विधी पळसापुरे आणि तायक्वांदो क्रीडा प्रकारातील सिद्धेश्वर लंके यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून ज्ञानेश्वर माळी, महसूल सहायक किरण साळुंखे, अहमदपूर उपविभागातील मंडळ अधिकारी तानाजी भंडारे, चाकूर येथील अव्वल कारकून अनिल कचरे, महसूल सहायक राहुल चेरेकर, तलाठी प्रशांत तेरकर, अहमदपूर येथील शिपाई आकाश कंधारकर, कोतवाल वंदना टोकलवाड, लातूर उपविभागातील मंडळ अधिकारी अभिषक्ता बिरादार, अव्वल कारकून विद्यावान साळुंके, तलाठी सचिन तावशीकर, महसूल सहायक साक्षी झोलापुरे, शिपाई अंबादास यमजले, कोतवाल यशपाल कांबळे, उदगीर उपविभागातील मंडळ अधिकारी गणेश हिवरे, अव्वल कारकून गणेश चव्हाण, महसूल सहायक विअशाल कदम, तलाठी अनिल उमाटे, शिपाई सचिन स्वामी यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

निलंगा उपविभागातील देवणीचे नायब तहसीलदार राहुल पत्रिके, मंडळ अधिकारी संजय निटूरकर, अव्वल कारकून सतीश स्वामी, निलंगा तहसील कार्यालयातील तलाठी  बबन राठोड, वाचन चालक महादेव जाधव, शिपाई उत्तम दंडेवाड, कोतवाल दीपक म्हेत्रे, औसा-रेणापूर उपविभागातील औसा येथील अव्वल कारकून दौलत बंडगर, किनीथोटचे मंडळ अधिकारी त्रंबक चव्हाण, औसा येथील महसूल सहायक प्रशांत शिंदे (बंडाळे), खरोळाचे तलाठी अमोल काळे, औसा तहसील कार्यालयातील प्रकाश लोमटे, अजय लांडगे यांचाही ना. बनसोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आरोग्य विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

आरोग्य विभागामध्ये सुमन संस्थात्मक प्रसूतीचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल उदगीर सामान्य रुग्णालयाचा, तसेच द्वितीय पुरस्काराबद्दल लातूर स्त्री रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला. तसेच औसा येथे वैद्यकीय अधीक्षक पदावर उत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल डॉ. सुनिता पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन प्रथम पुरस्काराने उदगीर सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मृत्युंजय वंगे, तसेच लातूर स्त्री रुग्णालयातील प्रसूती विभागातील स्टाफ नर्स शारदा कलेढेले, उदगीर सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स संध्या पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. एनक्यूएएस अंतर्गत उत्कृष्ट कामकाजाबद्दल डॉ. पल्लवी रेड्डी, आयडीएसपी अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सय्यद बाबू जाबेर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट कामिगिरी करणाऱ्या लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते आणि विवेकानंद रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राध्येश्याम कुलकर्णी यांना गौरविण्यात आले.

प्रधानमंत्री पुरस्कार 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नोडल अधिकारी डॉ. बी. एस. बरुरे, डॉ. सोनाली नागठाणे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत डॉ. ए.सी. पंडगे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य सेविका अनुसया पंचगट्टे, आरोग्य सहायक रामचंद्र किनवाड, आरोग्य सेवक उत्तम वागढव यांचा सन्मान करण्यात आला.

भूजल ग्रामस्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या भूजल ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल लातूर तालुक्यातील हरंगुळ ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल निलंगा तालुक्यातील जाजनुर ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ग्रामपंचायतीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु घटकांचा सन्मान

असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु घटकांना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणाऱ्या सन 2020 मधील प्रथम पुरस्काराने लातूर एमआयडीसी येथील मे. बिदादा इंडस्ट्रीज, द्वितीय पुरस्काराने रेणापूर तालुक्यातील कुंभारी येथील मी. कृष्णाई मसाले उद्योग यांना, तसेच 2021 साठी प्रथम पुरस्काराने मे. अभिनील अॅग्रो इंडस्ट्रीज, द्वितीय पुरस्काराने लातूर येथील मे. बालाजी पाईप इंडस्ट्रीज यांना गौरविण्यात आले. सन 2022 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार औसा येथील मे. ट्रायडंट इंजिनीयरिंग यांना, तर द्वितीय पुरस्कार निलंगा येथील मे. संभा फुड्स अँड फ्लोअर मिल या उद्योगाला प्रदान करण्यात आला. रोख रक्कम व गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य
  • जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध स्पर्धांच्या आयोजनावर भर

लातूर,२६ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थितांना शुभेच्छा देताना बनसोडे बोलत होते. सर्वप्रथम बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे.  शेतीला संरक्षित सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्यात 128 गावातील 3 हजार 660 कामांसाठी 135 कोटी 85 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी 16 कोटी 69 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच डोंगरी तालुका अशी ओळख असलेल्या जळकोट तालुक्यात तिरू नदीवरील 7 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. यामुळे 2.24 दलघमी साठवण क्षमता तयार होणार आहे. त्याचा 496 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा होणार असल्याचे श्री. बनसोडे यांनी सांगितले.

गतवर्षी खरीप हंगामात 1 रुपया विमा हप्ता भरून शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी घेतला. या योजनेतून जिल्ह्यात 2 लाख 91 हजार शेतकऱ्यांना 198 कोटी 79 लाख रुपये भरपाई मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतून जिल्ह्यातील 43 विमा दावे मंजूर झाले असून आतापर्यंत 42 लाख रुपये अनुदान देण्यात आल्याचे बनसोडे म्हणाले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून आतापर्यंत 239 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या उद्योगांसाठी 2 कोटी 43 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी यंदा 4 कोटी 46 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील बोरसुरी डाळ, पटडी चिंच आणि कास्ती कोथींबीर या तीन उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ना. बनसोडे यांनी यावेळी नमूद केले.

फळबाग लागवडीला प्रोत्साहन

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत, यासाठी जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन 2023-24 मध्ये 740 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत विविध बाबींसाठी 330 लाभार्थ्यांना 2 कोटी 2 लाख रुपये अनुदान देण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

बेरोजगार युवक-युवतींसाठी राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असून या योजनेतून जिल्ह्यात 611 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी 6 कोटी 95 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 58 प्रस्ताव मंजूर झाले असून त्यासाठी 2 कोटी 35 लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच केंद्र शासनाने बारा बलुतेदारांमधील 18 घटकांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे. पारंपारिक व्यावसायिकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 872 जणांनी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा-2 सोबतच उदगीर, चाकूर येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. तसेच जळकोट येथे मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. चाकूर एमआयडीसी निर्मितीसाठी 266 हेक्टरचा प्रस्ताव लवकरच उच्च स्तरीय समिती समोर मांडला जाणार आहे. लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा- 2 साठी 482 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही गतीने करण्यात आली आहे, असे ना. बनसोडे यांनी यावेळी नमूद केले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब

लातूर जिल्ह्याला आरोग्य वर्धिनीमध्ये राष्ट्रीय स्तरावर गौरविले होते. प्रगतीचा तो वेग कायम असून एनक्यूएएस कार्यक्रमात जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 उपजिल्हा रुग्णालये, 2 ग्रामीण रुग्णालये आणि 1 स्त्री रुग्णालयाला एनक्यूएएस प्रमाणपत्र मिळाले आहे. यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना गडचिरोली येथे कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारचे शौर्य पदक जाहीर झाले आहे. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी उदगीर मतदार संघात 2023 मध्ये नवीन 9 हजार 500 महिला मतदारांची नोंदणी केली. त्यामुळे मतदार यादीतील लिंग गुणोत्तर 887 वरून 911 म्हणजे पोहचले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी आराखडा तयार

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागासाठी 39 कोटी 49 लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. लातूर शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान 2.0 अभियान अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यासाठी 259 कोटी 22 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तसेच लातूर शहरातील भुयारी गटार योजनेसाठी 305 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या आर्थिक वर्षात कुस्ती, फुटबॉल, डॉजबॉल, तायक्वांदो, मल्लखांब खेळाच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील कुस्तीची सर्वात मोठी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा उदगीर येथे  होणार असल्याचे क्रीडा मंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम राबविला जात असून यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना समाज कल्याण विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतून 2023-24 मध्ये आतापर्यंत 4 हजार 845 विद्यार्थ्यांना 10 कोटी 41 लाख रुपयेचा लाभ देण्यात आला असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जिल्हा वार्षिक योजनेतून दिव्यांग बांधवांसाठी हायड्रोथेरेपी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी उमंग इन्स्टिट्यूटला 20 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या थेरेपीमुळे दिव्यांगत्व कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

मराठा समाज बांधवांसाठी विविध उपक्रम

मराठा समाजासाठी शासनाने ‘सारथी’ संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महामंडळाने या आर्थिक वर्षात वैयक्तिक व्यावसायिक कर्जासाठी 498 जणांना 52 कोटी 25 लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळ देणार आहे. यासोबतच जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांना दाखले वितरण करण्यात येत आहे. हा प्रश्न शासन स्तरावर प्राधान्याने हाताळला जात असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना व उदगीर सैनिक विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, स्वरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, अटल भूजल योजना चित्ररथ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, ईव्हीएम जनजागृती चित्ररथ या पथसंचालनात सहभागी झाले होते.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीरमाता, वीरपिता यांची ना. बनसोडे यांनी भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी बनसोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सदानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.