छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित वाढीव आराखड्याचे सादरीकरण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद करणार  – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर,१० जानेवारी / प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या १००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित वाढीव आराखड्याचे आज राज्यस्तरीय बैठकीत  सादरीकरण  झाले. घाटी रुग्णालय विकास, पर्यटन विकास, जिल्हा परिषद इमारतीचे उर्वरित बांधकाम अशा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी दिले.

जिल्ह्याचा सन २०२४-२५ साठी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा आज राज्यस्तरीय बैठकीत सादर झाला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. सतिश चव्हाण, प्रधान सचिव सौरभ विजय आदी मंत्रालयातून तसेच विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड दूरदृष्य प्रणालीद्वारे  सहभागी होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून खासदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ (सर्वसाधारण) च्या आराखड्याचे सादरीकरण केले. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला वाढीव १००० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला.  त्यात एकूण गाभा क्षेत्रासाठी ६७० कोटी रुपये, बिगर गाभा क्षेत्रासाठी २८५ कोटी रुपये तर इतर योजनांचे ४५ कोटी रुपये याप्रमाणे समावेश आहे.  ४५७ कोटी रुपयांच्या कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा ५४३ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सन २०२४-२५ सर्वसाधारण साठी कमाल आर्थिक मर्यादा ४५७ कोटी रुपये आहे. यंत्रणांची एकूण मागणी १३४० कोटी ७० लक्ष रुपये इतकी असून अतिरिक्त मागणी ८८३ कोटी ७० लक्ष रुपयांची आहे. एकूण १००० कोटी रुपयांचा प्रस्तावित वाढीव आराखडा सादर करण्यात आला.

पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, जिल्ह्यातील घाटी रुग्णालय हे परिसरातील १४-१५ जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे व मोठे रुग्णालय असून तेथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद व्हावी. जिल्ह्यातील पर्यटन सुविधांचा विकास, क्रीडांगणांचा विकास यासाठीही तरतूद व्हावी अशी मागणी त्यांनी केली.  गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. सतिश चव्हाण यांनी जिल्ह्यातील शाळा खोल्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत निधीची मागणी केली. आ. बोरनारे यांनी वैजापुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या विकासाचा मुद्दा मांडला व निधीची मागणी केली.  जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठीही सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची व निधीची मागणी करण्यात आली. खा. इम्तियाज जलील यांनी घाटी रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी करण्यासाठी विस्तारीत सुतिकागृह बांधकामास निधी देण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, घाटी रुग्णालयाचा विकास, वैजापूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषद इमारतीचे उर्वरित बांधकाम व वेरुळ- घ्रुष्णेश्वर येथील पर्यटन सुविधांचा विकास यासाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले. उद्योगांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवून त्यामार्फत जिल्ह्यात शाळा खोल्यांचा विकास कार्यक्रम राबवावा, सुभेदारी विश्रामगृहाचा विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.