मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल

गव्हर्नरसह अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

मुंबई,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :-भारतीय रिझर्व्ह बँकेला मंगळवारी धमकीचा मेल मिळाला. यात आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मेलमध्ये म्हटले आहे की मुंबईत आरबीआय कार्यालये, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. ईमेलच्या माध्यमातून आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

 “आम्ही मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब लावले आहेत. खासगी क्षेत्रातील बँकांसह आरबीआयने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास,  अर्थमंत्री निर्मला सीतारामन, काही उच्च बँकिंग अधिकारी आणि भारतातील काही नामांकित मंत्र्यांचा समावेश आहे.”

या सोबतच या मेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आलेल्या तीन ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. यात RBI – न्यू सेंट्रल बिल्डिंग फोर्ट, HDFC हाऊस चर्चगेट, ICICI टॉवर्स BKC  या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच, दुपारी 1:30 वाजता या बॉम्बचा स्फोट होईल, असा इशाराही दिला होता.

 याच बरोबर, RBI गव्हर्नर आणि अर्थमंत्री या दोघांनीही त्यांच्या पदांचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि घोटाळ्याचा संपूर्ण खुलासा करून एक प्रेस स्टेटमेंट जारी करण्यास सांगितले आहे. तसेच, त्या दोघांसह यात सामील असलेल्या सर्वांना कठोर अशी शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

RBIच्या ईमेल आयडीवर आलेल्या या मेलमुळे एकच खळबळ उडाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘खिलाफत इंडिया’च्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आली होती. मेलमध्ये सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी केली जात आहे.