महिला व बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी – विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ७ : संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये अनेक तरुण मुले आणि मुली गुंतत आहेत व  अनेक टोकाच्या भूमिका ही घेत आहेत. महिला आणि बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

सायबर गुन्ह्यातील महिला सुरक्षेबाबत तसेच राज्यातील बेपत्ता झालेल्या महिलांच्या प्रश्नासंदर्भात आणि रेल्वे प्रवाशांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पोलिसांना सूचना देताना ई-मेलद्वारेही जर महिलांनी  तक्रारी केल्या तर त्याबाबत तात्‍काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा. मॅट्रिमोनियल साईटवरील खोटी माहिती देऊन मुलींना फसविणे व त्यांचावर लैगिक अत्याचार करणे तसेच लहान मुले व मुलींवर लैंगिक अत्याचार  याची संख्या वाढलेली आहे. लहानमुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असल्याने त्यांना सायबर क्राईमबाबत आवश्यक प्रशिक्षण देणेबाबत प्रयत्न करावेत. यामध्ये अनेक सामाजिक संघटना काम करतात. त्यांना या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करावे. तसेच हे प्रशिक्षण सर्व पालकांनाही द्यावे. दि 14 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत सायबर सुरक्षा व महिला हिंसाचार विरोधी प्रशिक्षण सप्ताह सुरू करावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले.

अनेक मुले व मुली मोठ्या प्रमाणात घरातून गायब होतात. यामागील कारणे शोधावीत व  यामुलांना शोधल्यानंतर तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली समुपदेशन करावे. यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे असेही निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. चर्चेमध्ये श्री.राजेंद्र सिंग अतिरिक्त पोलिस महासंचालक, श्री यशस्वी यादव विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे), श्री बैजल उपमहानिरीक्षक (सायबर गुन्हे) यांनी भाग घेतला.

रेल्वेमधील महिला सुरक्षेबाबत श्री. सेनगावकर, आयुक्त रेल्वे यांनी सर्व  सूचनांचे पालन करण्यात रेल्वे सुरक्षा पोलीस यशस्वी झाले आहेत व तुरळक अपवाद सोडल्यास सर्व केसेसमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याचे सांगितले. डॉ.गोऱ्हे यांनी यामध्ये जखमी होणाऱ्या नागरिकांना रेल्वे विभागाने आर्थिक मदत देण्याबाबत काय सुविधा आहेत याबाबत तपासण्याच्या सूचना दिल्या.

ठाणे व पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीबाबत सिडको, एमएमआरडीए व पीएमआरडीए यांच्यामधील भूखंड पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी श्री. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त पुणे व ठाणे शहराचे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री. दीपक देवरा व वाहतूक उपायुक्त श्री. अमित काळे हजर होते.

यावेळी पंढरपूर सोलापूर येथील  ऑगस्ट 2019 मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे पोलीस निरीक्षकाने मुलीवर आमिष दाखवून  केलेल्या बलात्कार प्रकरणाबाबतही पोलीस अधीक्षक सोलापूर व सांगली यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.