सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका घेण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर ,१८ डिसेंबर  /प्रतिनिधी :- नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथील प्रशासकीय मंडळाबाबतचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. येथे निवडणुका घेऊन मंडळ गठित करणे आणि अध्यक्ष नेमण्याबाबत येत्या आठ ते पंधरा दिवसांत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य मोहनराव हंबर्डे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री दिलीप लांडे, अशोक चव्हाण यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, शासनाने सचखंड गुरूद्वाराच्या कायद्यात दुरूस्ती करून सदस्यांच्या नेमणुकीची अधिसूचना काढली होती. यानुसार अध्यक्ष निवडीच्या शासनाच्या प्रक्रियेस आक्षेप घेत स्थानिक समाजाने गुरूद्वारा बोर्डाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. हा प्रश्न तातडीने सोडविण्याचीच शासनाची भूमिका असून न्यायालयात याचिका दाखल असल्याने विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन निवडणुका घेणे, गुरूद्वारा मंडळ गठित करणे, अध्यक्ष नेमणे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.