पुण्याहून आलेले पाच विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले! चार मुलींचा समावेश

देवगड : देवगड येथील समुद्र किनारी पोहण्यास उतरलेले पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे पाच विद्यार्थी बुडाले. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. ते समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाचजण बुडू लागले. त्यावेळी आकाश तुपे त्यांना वाचविण्यास गेला. मात्र तोपर्यंत ते पाचजण खोल पाण्यात गेले. चार मुलींचे मृतदेह सापडले असून एक बेपत्ता आहे. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे.

देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नसुन हा पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित समुद्र किनारा मानला जातो. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अतिउत्साह दाखवल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. खोल समुद्राने गेल्याने आणि लाटांमध्ये अडकल्याने पर्यटक बुडतात. आज घडलेली दुर्घटना ही देवगडच्या समुद्रात घडलेली सर्वात मोठी दुर्घटना असल्याचं बोललं जात आहे.