शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवेसाठी साऱ्यांचे सहकार्य आवश्यक-डॉ.ओमप्रकाश शेट्ये

छत्रपती संभाजीनगर ,६ डिसेंबर / प्रतिनिधी :-समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवेतील तसेच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सर्वोत्तम आरोग्य योजनेचा लौकीक कायम राखावा, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी आज येथे केले. 

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना या योजनांचा एकत्रित आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, डॉ. रवि भोपळे, डॉ. मिलिंद जोशी तसेच योजनांशी संलग्नित हॉस्पिटल्सचे संचालक, डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, दि.१ एप्रिल ते दि.५ डिसेंबर पावेतो जनआरोग्य योजनांशी जिल्ह्यात ३८ हॉस्पिटल्स संलग्नित आहेत. त्यात आतापर्यंत २२ हजार ७३४ रुग्णांवर  ४६ हजार २८ उपचार/ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून १२५ कोटी २१ लक्ष ४ हजार २६ रुपयांचा लाभ मिळाला आहे.

डॉ. शेट्ये यांनी सांगितले की, या योजनांद्वारे गोरगरिबांना आरोग्य उपचार सुविधा मिळाव्या हा उद्देश असून त्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ही योजना राबवितांना संलग्नित हॉस्पिटल्सना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करुन अधिककाधिक लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे,असेही त्यांनी सांगितले.

जन आरोग्य योजनांचा लाभ देता यावा यासाठी आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आयुष्मान भारत कार्डासाठी नोंदणी, ई केवायसी साठी प्रयत्न सुरु आहेत,असे डॉ. रवि भोपळे यांनी सांगितले.

डॉ. शेट्ये यांनी संलग्नित रुग्णालय संचालकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. डॉ. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. भोपळे यांनी आभार मानले.