सत्ताधारी महायुतीत धुसफूस! मुख्यमंत्र्यांचा अजित पवार गटाबद्दल नाराजीचा सूर

मुंबई,५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. तरीही शिंदे गट आणि अजित पवार गटात एकवाक्यता दिसत नाही. महायुतीतील या धुसफुसीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाबद्दल नाराजीचा सूर आळवला आहे.

मराठा आरक्षणावरुन आंदोलक सरकारविरोधात आक्रमक झालेले असताना सत्ताधारी महायुतीत समन्वय नसल्याचे दिसून आले. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण कसे मागे घेता येईल, यासाठी प्रयत्न करीत होते. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याचे चित्र होते. आंदोलक रस्त्यावर उतरुन जाळपोळ, तोडफोड, दगडफेक करीत होते. त्यात राजकीय नेत्यांनाच लक्ष्य केले जात होते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी थेट मंत्रालयासमोर सरकारविरोधात आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून महायुतीत धुसफूस असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली येथे उपोषण सुरू केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून उपोषण सोडविले होते. त्यावेळी ४० दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, ४० दिवसांत काहीही झाले नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आणि दिलेली मुदत संपताच अगोदरच घोषित केल्याप्रमाणे पुन्हा अंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू केले. याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. राज्यात सुरुवातीला सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. तसेच रास्ता रोको, रेल रोको, चक्काजाम, अन्नत्याग आंदोलन, उपोषण आदी माध्यमातून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे समर्थन केले. राज्यात आणि मराठवाड्यात सर्वत्र आंदोलनाची तीव्रता अधिक होती. छ. संभाजीनगर, बीडमध्ये तर थेट राजकीय नेत्यांना लक्ष्य करून जाळपोळ केली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. अशा स्थितीतही जरांगे पाटील भूमिकेवर ठाम होते. यामुळे राजकीय नेत्यांवर दबाव वाढला. यातून शिंदे गटाचे दोन खासदार आणि काही इतर आमदारांनी राजीनामा दिला. त्यातच अजित पवार गटाच्या काही आमदारांनी थेट मंत्रालयासमोरच आंदोलन केले आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. थेट सरकारविरोधात अजित पवार गटाचे आमदार उतरले. त्यातच अजित पवार गटाचेच आमदार प्रकाश सोळंके यांनी हिंसक आंदोलनाला राज्याचे गृहखातेच जबाबदार असल्याचे सांगत थेट गृहमंत्री फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला.

संकटकाळात तरी एकजूट ठेवा

जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यात यश मिळाल्यानंतर शुक्रवारी वर्षावर आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि संकटाच्या काळात महायुतीने एकजुटीने उभे राहिले पाहिजे आणि सरकारची बाजू उचलून धरली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. यावरून महायुतीत धुसफूस कायम असल्याचे चित्र समोर आले.