शरद पवारांच्या पक्षात लोकशाहीचा मोठा अभाव; घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते

निवडणूक आयोगात अजित पवार गटाचा जोरदार युक्तिवाद

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी पक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार काही आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यावेळेस ही फूट नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. शरद पवारांनी देखील अजित पवारांनी केवळ वेगळी भूमिका घेतली मात्र कोणतीही फूट पडलेली नाही, असं म्हटलं होतं. मात्र, आता हे दोन्ही गट निवडणूक आयोगात आमनेसामने आले आहेत आणि युक्तिवाद करत आहेत. प्रत्येक गट राष्ट्रवादी हा आमचाच पक्ष आहे आणि चिन्हदेखील आमचंच आहे, यावर ठाम आहे. त्यामुळे कितीही नाकारलं तरी ही राष्ट्रवादीतील फूटच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवार गटाकडून आजच्या सुनावणीत तर थेट शरद पवारांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच वाढला असल्याची ही चिन्हे आहेत. अजित पवार गटातून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. त्यांनी म्हटले की, पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं. शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता. तसेच आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्यासोबत असून त्यांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ५३ पैकी ४२, विधानपरिषदेचे ९ पैकी ६ आणि नागालँडमध्ये ७ पैकी ७ असे ५५ आमदार आमच्या पाठिशी, तर लोकसभेत ५ पैकी १ आणि राज्यसभेतील ४ पैकी १ खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा गेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. आज अजित पवार गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.

अजित पवार गटाने युक्तिवादात काय मुद्दे मांडले?

  • शरद पवार घराप्रमाणे पक्ष चालवत होते.
  • शरद पवार स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात?
  • निवडणूक न घेताच पवारांची अध्यक्षपदी निवड, त्यांच्या अध्यक्षपदावर आजही आक्षेप.
  • शरद पवारांची निवड नियमांना धरुन नाही.
  • अजित पवार गटाकडून सादिक अली केसचा दाखला देण्यात आला. या केसमध्ये आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं होतं.
  • वारंवार शिवसेनेच्या केसचाही उल्लेख करण्यात आला.
  • राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार काम झालं नाही.
  • आमच्याकडे एक लाखांहून अधिक शपथपत्रं आहेत, तर शरद पवार गटाकडे चाळीस हजार शपथपत्रं देखील नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर एकत्र सुनावणी

राज्यात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात झालेल्या बंडखोरी नंतर दोन्ही गटकडून पक्षावर आपला ताबा सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विलंब करत असल्याचं कारण देत शिवसेना ठाकरे गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही दोन्ही प्रकरणे वेगळी असली तरी राज्यघटनेच्या १० व्या सुचीवर संबंधित आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकत्रच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे आमदार आणि अजित पवार गटाचे आमदार या दोन्ही प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एकत्र ऐकण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार अपात्रतेवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात येणार असून १३ आक्टोबर ही तारीख यासाठी निश्चिक करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याचं ठरवल्याने विधानसभा अध्यक्षांना एकच निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ८ आमरांची पहिली याचिका होती. त्यानंतर अन्य आमदारांवरही कारवाई करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यातच शिवसेनेची देखील या प्रकरणी याचिका प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणे एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपल्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली होती. परंतु दोन्ही याचिका एकत्र घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्ययालयाने घेतला आहे. त्यामुळे याप्रकरणाचा निर्णय आता लवकर लागण्याची शक्यता आहे.