धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई,४ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंचच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. विखे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. विखे पाटील यांना दिले. दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून मंत्री श्री. विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पल्लवी लांडे, संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.