राज्यातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर! औषधांअभावी नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू 

नांदेड ,२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे.

रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे. हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. ‘हाफकिन’ ने औषधी खरेदी करु न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधींचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयात सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या रुग्णालयात नांदेडसह, हिंगोली, यवतमाळ, परभणी, वाशिम आणि शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. रुग्णसंख्या वाढत असताना औषधींच्या तुटवड्याचा विषय देखील गंभीर होत चालला आहे.

या रुग्णालयात आजही बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यात गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला अशून त्यात ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे. परंतु रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन शेवटच्या क्षणी रेफर रुग्णांचा मयतामध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे.

याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने प्रतिक्रिया दिली असून, या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 नांदेड येथील घडलेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सोबतच आपण स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी करणार असल्याचे देखील मुश्रीफ म्हणाले. तसेच, “हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे हे चौकशी केल्याशिवाय समजणार नाही. आमचे आयुक्त तत्काळ आजच तिकडे निघणार आहेत. तसेच मी देखील उद्या जाऊन सर्व घटनेचा आढावा घेणार असल्याचे,” मुश्रीफ म्हणाले.

एवढ्या कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयातील अधिकारी टाळाटाळ करत आहेत. परंतु, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बडतर्फ करा किंवा राजीनामा द्या, अशी मागणी करत विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रुग्णालयाचे डीन एस. वाकोडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, विविध कारणांमुळे सहा पुरुष आणि सहा मादी अर्भकांचा मृत्यू झाला. तर, आणखी 12 प्रौढांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी बहुतेकांचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले की, या मृत्यूंव्यतिरिक्त, जिल्ह्यातील इतर खाजगी रुग्णालयातून रेफर केलेले आणखी 70 रुग्ण ‘गंभीर’ असल्याची नोंद आहे.

“मी हॉस्पिटलच्या डीनशी बोललो, त्यांनी सांगितले की नर्सिंग आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांची कमतरता आहे. काही उपकरणे काम करत नाहीत आणि काही विभाग विविध कारणांमुळे कार्यान्वित नाहीत. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे,” चव्हाण म्हणाले.

रुग्णालयाची क्षमता ५०० रूग्णांची असताना आज तिथे सुमारे १ हजार २०० रुग्ण दाखल आहेत.सदर रुग्णालयात दाखल ७० गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असेल तर खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, अशी सूचना मी प्रशासनाला केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पाठविणार असल्याची माहिती दिली आहे. येथील असुविधा व अडचणींबाबत माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा झाली. रुग्णालयाची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी मी त्यांना केली आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज मी कोणत्याही निष्कर्षावर जाणार नाही. चौकशीअंती दोष कुणाचा हे स्पष्ट होईल. परंतु, राज्य सरकारने तातडीने रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.