पंकजा मुंडेंना देखील आलाय ‘तो’ अनुभव ; मराठी असल्याने मुंबई घर नाकरल्याच्या आठवणींना दिला उजाळा

मुंबई ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-मुंबईतील मुलुंडसारख्या ठिकाणी केवळ मराठी असल्यामुळे तृप्ती देवरुखकर यांना ऑफिससाठी जागा नाकारल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल होत असून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळणं हे काही महाराष्ट्राला नवीन नाही, पण याबाबत मराठी माणसानेच जागरुक होणं गरजेचं आहे. राज ठाकरेंच्या मनसेने यावर कडक पावले उचलत जागा नाकारणाऱ्यांना तृप्ती यांची माफी मागायला लावली. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यादेखील या घटनेवर व्यक्त झाल्या. यावेळेस केवळ मराठी असल्यामुळे मलादेखील घर नाकारण्यात आलं होतं, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला.

नुकत्याच केलेल्या शिवशक्ती दौऱ्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रकृती काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे त्यांना बोलायला अडचण होत होती. शिवाय सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे त्यांची मनस्थितीही खराब असल्याचे त्यांनी व्हिडीओच्या सुरुवातीला सांगितले. तृप्ती देवरुखकर यांच्यासोबत झालेल्या प्रकाराबद्दल बोलताना पंकजाताई म्हणाल्या, आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय पूर्ण प्रवासात मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराची नावं ठेवावी, दुकानाची नावं ठेवावी यामध्ये मी कधी फार उडी घेतली नाही.

पुढे त्या म्हणाल्या, परंतु एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यासोबत जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत. मी कोणत्या एका भाषेची, एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने, प्रत्येक धर्माने नटलेलं आहे. ही राजकीय नसून, आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे. त्यामुळे इथे सर्वांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही, असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील, तर हे फार दुर्दैव आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपण गणपतीचं विसर्जन नाही करायचं तर…

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे. या देशात प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेच्या प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या लोकांना, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय? हा माझा प्रश्न आहे. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. आपण गणपतीचं विसर्जन नाही करायचं, गणेशाचा आशीर्वाद घेऊन सगळ्या नकारात्मकतेचं विसर्जन करायचं. सगळ्या आतंकाचं विसर्जन करायचं, सगळ्या वादांचं, जाती, धर्म, प्रांत, भाषा या सर्वांचं विसर्जन करायचं, असं आपण ठरवू शकत नाही का? बघा कसं वाटतं तुम्हाला. माझी भूमिका परत परत ऐका. कोणा एकासाठी नाही पण ही भूमिका सर्वांनी एक व्हावं यासाठी आहे.

आपल्या देशाला पांढरा रंग कधी व्याप्त करेल…

आज इतकी सगळी समृद्धी आहे, रस्ते आहेत, गाड्या आहेत, लोकांना सगळ्या सुविधा आहेत, प्रत्येकाकडे गाड्या आहेत, हायवे आहेत, साधनं आहेत, हे सगळं असताना, कुठेतरी अस्वस्थता वाटते समाजात. आरक्षणासाठी भांडणं सुरु आहेत, कुणी आंदोलनं करतं, मुंडन करतं, हे सगळं बघून हृदयाला पिळ पडतो. त्याचबरोबर माणूस समाजात प्रत्येक रंगांमध्ये वाटला गेला आहे. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. हे सगळं बघून असं वाटतं की एका चक्रावर बसून हे रंग जोरजोरात एकत्र करुन फिरवले तर त्यातून एक पांढरा रंग येतो. तो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल याची मी प्रतीक्षा करते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.