कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची आजच्या क्रांतिदिनी सुरुवात करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण; देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ :- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनी झाली. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितले आणि देशवासियांना ‘करेंगे या मरेंगे’चा संदेश दिला. महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या त्या निर्णायक आंदोलनानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या ऐतिहासिक दिवसाचे, 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहिद झालेल्या वीर सैनिकांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी देशातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन या आंदोलनात सहभागी झाली होती. प्रमुख नेते तुरुंगात गेले तरी त्यांची जागा घ्यायला नवनवीन तरुण पुढे येत होते. आपला देश आज स्वतंत्र, सार्वभौम असून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, याचं श्रेय आपल्या पूर्वजांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्याला आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता चिरंतन ठेवण्याचा निर्धार आपण करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


9 ऑगस्ट 1942 ला आपल्या पूर्वजांनी इंग्रजांपासून मुक्तीचा लढा तीव्र केला होता. आज 9 ऑगस्ट 2020 ला आपल्याला कोरोनापासून मुक्तीचा लढा तीव्र करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करुया. यंदाचा ऑगस्ट क्रांतीदिन हा कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची सुरुवात ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *