गौरी-गणपतींचे उत्साहात विसर्जन

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी भावनिक साद घालीत गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. माहेरवाशीण गौरींसह गणपतींचे गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजरात शनिवारी विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, या जयघोषांसह गणपती व गौरीला भावपूर्ण वातावरणात निरोप देत विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी विधिवत पूजा, आरती करून भक्ती भावाने गणरायाला निरोप देण्यात आला.

बाप्पांसाठी सर्वत्र फुलांचा वर्षाव होत असताना वरुणराजानेही हजेरी लावल्याने विसर्जन मिरवणुकीला आणखी रंग चढला होता. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, मढ-मार्वे आदी ७२ विजर्सन स्थळांसह २६ कृत्रिम तलावात गणरायांचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले.

अनेक ठिकाणी गणपती बाप्पा, गौराईंसोबत सेल्फी काढून घेताना गणेशभक्त दिसत होते. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी चौपाट्यांवर भक्तांची मांदियाळी होती. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलीस, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज आहेत. चौपाट्यांवर उभारण्यात आलेल्या टेहळणी मनो-यांवरून आणि ठिकठिकाणी समाजसेवी संस्थांनी उभारलेल्या स्वागत कक्षांमधून स्पिकरद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत होत्या.

किनारपट्टी परिसरात कोणतीही अपरिचित घटना घडू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. पावसाने सायंकाळी पाचच्या दरम्यान काहीसा जोर धरून गणरायांसह गौराईंना निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती. संध्याकाळी ६ नंतर दादर आणि गिरगाव चौपाट्यांवर गणेशभक्तांची गर्दी वाढली.