विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

• संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय

लातूर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या 15 दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापक यांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा बैठकीत मुश्रीफ बोलत होते. अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, प्राध्यापक डॉ. शैलेन्द्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता डी. बी. नीळकंठ यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य असून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा सामान्य रुग्णालयांशी त्या त्या वेळी जोडले गेले.तसेच काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या असल्याने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध पदांची पदभरती प्रक्रिया सुरु असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

गरीब, गरजू कुटुंबांसाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून औषध उपचाराची सुविधा आता 5 लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील खासगी रुग्णालयातही रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. तसेच सध्या राज्यात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असून कॅन्सर होऊच नये यासाठी प्रबोधनाची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपुलकीने वागण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते बौद्धिक दिव्यांग मुलांना टीएलएम कीटचे वितरण करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे दिव्यांगासाठीचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे ना. मुश्रीफ यावेळी म्हणाले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, डॉ. शैलेंद्र चव्हाण, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य वैजनाथ व्हनाळे, सुरज बाजूळगे, पारस कोचेटा, व्यंकट लामजने, योगेश बुरांडे उपस्थित होते.