प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई,२४ ऑगस्ट /प्रतिनिधी :-सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहगे. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी आज (२४ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी आपला देह त्यागला. गेल्या काही वर्षापासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी जवळपास हिंदी मराठी मिळून ८० सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे.

सीमा देव यांनी अनेक सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. ‘सरस्वतीचंद्र’ (१९६८), ‘आनंद’ आणि ‘ड्रिम गर्ल'(1977) या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राव शोककळा पसरली आहे. सीमा देव यांचे पती रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या ‘सुवासिनी’. ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देव देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

‘आलिया भोगासी’ या १९५७ साली आलेल्या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. अनेक चित्रपटातील भूमिका लक्षवेधी ठरल्या. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री

 ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. देव कुटुंबीय गत अनेक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.