‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

मुंबई,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :-भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचे विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी  मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले

मुख्यमंत्री म्हणतात की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे…  या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चांद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले.  चांद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की,  भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.

परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज ‘चांद्रयान ३’ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे असेही मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात.

चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
image.png

जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्व‍ितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व मोहिमांना चांद्रयान-3 मोहिमेमुळे बळ मिळाले आहे. भारत जगातील एक महत्त्वाचा देश बनला असून आगामी काळात जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन.  त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चांद्रयान-3 मोहीम भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेतून चंद्राचे अनेक रहस्य उलगडले जातील. आगामी काळात भारत चंद्रावर नक्की मानव उतरवेल. भारतीय शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम पूर्ण केली आहे. भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास आला आहे.  भारतीय नागरिक, शास्रज्ञ, तंत्रज्ञ या सर्वांचे मी अभिनंदन करतो. याबरोबरच मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर या शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचाही अभिमान वाटतो. या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार झालो याबद्दल जगभरातील भारतीयांचे अभिनंदन.

‘चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
image.png

 ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासियांच्या एकजुटीतून मिळालेलं हे यश असल्याचे सांगत ‘चांद्रयान-3’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

‘चांद्रयान-3’ची मोहिम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्रमोहिमेच्या यशान त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहिम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानंही आपलं योगदान दिलं. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर, तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.  इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.