भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात

वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करण्याचा संकल्प करुया – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  • जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थिताना दिली तंबाखू मुक्ती व निपूण लक्षची शपथ
  • देशाच्या सीमेवर लढणाऱ्या व बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियाचे, स्वातंत्र्य सेनिक, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द

हिंगोली ,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :-  जिल्ह्यात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी हेल्मेट व शीटबेल्टचा वापर करण्याचा संकल्प करुया,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव दलाचे समादेशक पोर्णिमा गायकवाड, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करुन आपल्या कुटुंबासाठी योगदान द्यावे असे सांगून देशाच्या सीमेवर लढणाऱ्या व बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियाचे, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिकांचे जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू विरोधी शपथ, निपुण लक्ष शपथ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांना दिली.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी श्री. पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील भूमिपूत्र शहीद जवान रणवीर गणपत भिकाजी यांना जम्मू काश्मीर युध्दजन्य परिस्थितीत फायरींग दरम्यान गोळी लागून दि. 30 जुलै, 2005 रोजी विर मरण आलेले आहे. त्यांच्या वीर पिता भिकाजी रणवीर व वीर माता लक्ष्मीबाई भिकाजी रणवीर यांना साडीचोळी आहेर देऊन सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अनुकंपा उमेदवार ज्ञानेश्वर कापसे व मल्लिकार्जून कापसे यांना तलाठी संवर्गात नियुक्ती आदेशाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील भाग क्र. 332-दाटेगाव चे बीएलओ संजय चिंगाजी जाधव मोबाईल ॲपद्वारे 100 टक्के, भाग क्र. 331- राहोली बु. चे बीएलओ एस.एस. जाधव यांनी 99.63 टक्के तर भाग क्र. 267-हिंगोली चे बीएलओ एस.आर. चौधरी यांनी 90 टक्के काम पूर्ण केल्यामुळे त्यांना यवेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय, लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल आणि जिल्हा समवन्यक डॉ.मोहसीन खान यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉ.बालाजी भाकरे यांनी भारतात सर्वाधिक 55 हजार ओपीडी रुग्णांची तपासणी केल्यामुळे त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.   तसेच येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी तेजस किरण नागरे यांनी सीबीएसई आठवी स्कॉरशीप परीक्षा पास होऊन राज्यात दुसरा आल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.