हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष भरुन काढण्याचे नियोजन; उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – जलसंपदामंत्री जयंत पाटील

विधानसभा लक्षवेधी

मुंबई,२१ मार्च  /प्रतिनिधी :- हिंगोली जिल्ह्याचा १५ हजार १६० हेक्टर क्षेत्रापैकी सद्यस्थितीत ७ हजार ९१० हेक्टर सिंचन अनुशेष शिल्लक आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी विभागाने ९६१२ हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन केले असून यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरण आणि सापळी धरण प्रस्तावित असून इसापूर धरणाचे काम १९८२ साली पूर्ण झाले असून सापळी धरणाचे काम जनविरोधामुळे अद्याप सुरु झालेले नाही. तरीही सापळी धरणाच्या मंजूर १९९ दशलक्ष घनमीटर नियोजित पाण्यातून हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी ६१.४३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. सापळी धरणाचे बांधकाम न झाल्यामुळे १९९ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट निर्माण झालेली आहे, ही तूट भरून काढण्यासाठी सापळी धरणास पर्यायी मौजे खरबी येथे कयाधू नदीवर उच्च पातळी बंधारा बांधून येथून इसापूर धरणात प्रवाही पद्धतीने १०२.४६ दशलक्ष घनमीटर पाणी वळविण्याच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता मिळालेली आहे, याबाबत सविस्तर सर्वेक्षण आणि अन्य काम प्रगतीपथावर असून मौजे खरबीच्या खाली उर्वरित पाणलोट क्षेत्रात ३५.११ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहत असल्याचे सांगून सापळी धरणाच्या खालील भागात नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणारे पाणी नदीतून वाहणार असल्यामुळे नदी कोरडी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील अनुशेष निर्मूलनासाठी जलसंपदा विभागामार्फत ९६९२ हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन करण्यात आले असून उर्वरित क्षेत्राकरिता लहान बंधारे बांधण्यास जलसंधारण विभागाला सांगण्यात आले आहे, असेही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले. या विषयावरील चर्चेत विधानसभा सदस्य तानाजी मुटकुळे, राजू नवघरे आदींनी सहभाग घेतला.