मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी अधिवक्ता मंजुषा अजय देशपांडे यांची निवड 

छत्रपती संभाजीनगर,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी येथील अधिवक्ता मंजुषा अजय देशपांडे यांची निवड झाली.या नियुक्तीला केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिली.

देशपांडे यांच्या नियुक्तीबाबत कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून घोषणा केली.

अ‍ॅड. मंजुषा अजय देशपांडे यांच्या नावाची शिफारस भारताचे सरन्यायाधीश धनंजय  चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने यावर्षी १८ जुलै रोजी केली होती. कायद्याच्या अनेक शाखांमध्ये, विशेषत: घटनात्मक आणि सेवाविषयक बाबींमध्ये मंजुषा देशपांडे या  एक सक्षम वकील आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या  नावाची शिफारस करण्यात आली होती.

२६ सप्टेंबर २०२२ मध्ये, तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने देशपांडे यांच्या नावाची शिफारस सुप्रीम कोर्टाच्या  कॉलेजियमकडे केली.तथापि, सुप्रीम कोर्ट  कॉलेजियमने २ मे रोजी शिफारशीवरील निर्णय पुढे ढकलला आणि या कॉलेजियमने   केलेल्या काही आक्षेपांवर व मुद्द्यांवरून न्याय विभाग कार्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय व्ही गंगापूरवाला (जे आता मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत) यांच्याकडून अहवाल मागवला. त्यानंतर न्या. गंगापूरवाला यांनी  १० मे रोजी औरंगाबाद खंडपीठात आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल सादर केला.अहवालावर विचार केल्यानंतर कॉलेजियमने मंजुषा देशपांडे यांच्या  नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती.गुरुवारी त्यांचे नाव पदोन्नतीसाठी मंजूर केले.

सद्यस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ६६ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. मुंबईच्या प्रमुख खंडपीठात आणि औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठांवर एकूण १० महिला न्यायाधीश आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयानंतर मुंबई उच्च न्यायालय  हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे न्यायालय आहे.

एससी कॉलेजियमने मंजुषा देशपांडे यांच्या नावाची शिफारस करताना सांगितले की, “आमच्या मूल्यांकनानुसार उमेदवार सक्षम वकील आहे.” देशपांडे १९९१ पासून ३२ वर्षांहून अधिक काळ वकिली  करत आहेत आणि कायद्याच्या अनेक शाखांमध्ये, विशेषत: घटनात्मक आणि सेवाविषयक बाबींमध्ये त्यात पारंगत आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. देशपांडे यांनी २०१३  पासून सरकारी वकिलांच्या पॅनलवरही काम केले.

“उमेदवाराच्या उन्नतीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर विशेषत: औरंगाबाद खंडपीठासमोर प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकिलांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल.या  बाबी लक्षात घेऊन आणि त्यांच्या  पदोन्नतीच्या प्रस्तावावर विचार करून कॉलेजियमचे असे मत आहे की श्रीमती. मंजुषा अजय देशपांडे या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी योग्य आहेत,” असे ठरावात म्हटले आहे.