कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

स्वतःच्याच स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य

कर्जत : मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कला दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध असलेले आणि कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत येथील त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे . या वृत्ताने सबंध मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे.

स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ते लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांची अशा प्रकारे आत्महत्या हा एक मोठा धक्का आहे.

नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते. ‘राजा शिवछत्रपती’ या अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेल्या मराठी मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती.

२०११ मध्ये, त्यांनी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जय हिंद’ या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीसह सांस्कृतीक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक तणावातून? 

भारतीय जनात पक्षाचे नेते आमदार महेश बालदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, नितीन देसाई हे काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या स्टुडिओत कोणताही मोठा सिनेमा आला नव्हता, फक्त मालिकांचं काम सुरु होतं. असं देखील बालदी म्हणाले. साधारण महिनाभरापूर्वी झालेल्या भेटीत देसाई यांनीचं याबाबत सांगितलं. तसंच सध्यातरी त्यांच्या आत्महत्येला आर्थिक तणाव हेच कारण असू शकतं असं देखील बालदी म्हणाले.

देसाई यांच्या आत्महत्येची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत येथील सेटवर एका कर्मचाऱ्यांने पोलिसांना देसाई यांच्या निधनाची बातमी दिली. यानंतर पोलिसांचं पथक स्टुडिओत पोहचल्यावर त्यांना नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. या प्रकरणाचे सर्व पैलू पडताळून पाहण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचं घार्गे यांनी सांगितलं.

नितीन देसाई गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी मुंबईच्या लालबागच्या राजासाठी पंडाल डिझाइन करण्यासाठी देखील ओळखले जात होते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ही आमच्यासाठी दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. रविवारी ते आमच्यासोबत त्यांच्या टीमसह जवळपास २ तास पंडालच्या कामावर लक्ष ठेवून होते. असं काही घडू शकतं याचा कोणताही मागमूस नव्हता. देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते. तसंच ते २००९ पासून आमच्यासोबत जोडले गेले होते. मध्यंतरी एक वर्ष त्यांची तब्येत खराब होती, त्यावेळी त्यांनी पंडालची रचना केली नसावी. अन्यथा, त्यानंतर ते आमच्यासोबत होते. त्यांनी आपलं काम नेहमी वेळेवर पूर्ण केलं. सर्वांनी नेहमी त्यांचं कौतूक केलं. ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. ” असं साळवी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली!

 सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत वयाच्या ५८व्या वर्षी आयुष्य संपवले. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक, निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते देखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले होते तेव्हा कमळातून मोदींना भाजपाच्या कार्यकत्यांसमोर पेश केलं गेलं होतं. ती कल्पनाही नितीन देसाई यांची होती. त्यानंतर नरेंद्र मोदी नितीन देसाई यांच्या प्रेमातच पडले.

संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला – मुख्यमंत्री

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणा-या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबींयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं, ऐकून धक्का बसला – अजित पवार

“कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून जाणं अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं आहे. नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते. कलादिग्दर्शक असण्याबरोबरंच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचं मनापासूनचं सहकार्य असायचं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णममहोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केलं. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणा-या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. हिन्दी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही त्यांचं वागणं साधं, विनम्र होतं. त्यांच्या निधनानं भारतीय कलासृष्टीचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी नितीन देसाईंच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

नितीन देसाई यांची एक्झिट चटका लावणारी – राज्यपाल

नितीन देसाई महाराष्ट्र आणि देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले कला दिग्दर्शक होते. त्यांची विचारशक्ती आणि कल्पनेला मूर्त रुप देण्याची क्षमता अफाट होती. अनेक चित्रपट, महानाट्य व कॉर्पोरेट इव्हेंट्सच्या वेळी त्यांनी साकारलेले भव्य – दिव्य नेपथ्य व कला सजावट थक्क करणारी होती. मोठे स्वप्न पाहण्याचा व ते साकार करण्यासाठी झटण्याचा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. नितीन देसाई यांची एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हरहुन्नरी कलावंत अचानक जाईल, अशी कल्पनाही नव्हती – फडणवीस

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. चित्रपट आणि कला क्षेत्रात त्यांनी अतिशय बहुमूल्य योगदान दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. मी मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे त्यांनी यशस्वी संयोजन केले होते. त्यांच्या कला दिग्दर्शनामुळे अनेक चित्रकलाकृतींनी वेगळी उंची गाठली. त्यांचा कलाकृतीला स्पर्श म्हणजे ‘मीडास टच’ होता. असा हा हरहुन्नरी कलावंत आपल्याला अचानक सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

अक्षय कुमारचा मोठा निर्णय

अक्षय कुमारनेही नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ओ माय गॉड २ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज त्याने पुढे ढकलला आहे.

OMG 2 चा ट्रेलर आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. पण त्याआधीच नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे अक्षयने एक ट्विट शेअर करत आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार नसल्याचे सांगितले.

अक्षय कुमारने ट्विट करून चाहत्यांना ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला यावर विश्वास बसत नाही आणि नितीन देसाई यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. नितीन देसाई हे प्रॉडक्शन डिझाईनमधील एक दिग्गज होते. ते सिने विश्वाचा एक मोठा भाग होते. त्यांच्या जाण्याने खूप मोठे नुकसान झाले आहे.

नितीन देसाईंबाबत राज ठाकरेंचं भावनिक ट्विट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

नितीन देसाई यांनी आदरांजली वाहताना राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ज्येष्ट कला दिग्दर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली. त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैसा हा मोठाच असावा लागतो. आणि असा पैसा असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो. त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो. हे अनाकलनीय आहे. नितीन धिराचा माणूस होता. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता. त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल याचा छडा लागला पाहीजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये. हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली खंत

अभिनेते आदेश बांदेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, “कलादिग्दर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर नेण्यात नितीनचा मोठा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्याच्या कामाबद्दल प्रत्येकालाच अभिमान वाटायचा. नितीन हा जगन्मित्र होता. त्याचं सर्वांशी उत्तम बोलणं, संवाद साधणं सुरु असायचं. नितीननं आत्महत्या करणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. ज्या क्षणी मला ही बातमी कळली. त्या क्षणी मला खूप वाईट वाटलं.” असं बांदेकर म्हणाले.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, “त्यानं बोलायला हवं होतं. संवाद साधायला हवा होता. पण काहीच नाही. त्याचा कधी फोन आला तर तो सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतोय, असं सांगण्यासाठी असायचा. मी अनेक टप्प्यांवर त्याचा प्रवास बघितला आहे. आम्ही विविध संकल्पनांसाठी एकत्र काम केलंय. मी मोठमोठ्या सोहळ्यांचं दिग्दर्शन करत असताना तो असायचा. त्यानं असं का करावं? हा प्रश्न पडला आहे.” अशी खंत आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.